72च्या दुष्काळात 10बोअर फेल; गावकऱ्यांनी अशी शक्कल लढवली की भलेभले अधिकारीही झाले थक्क! । Maharashtra Drought 1972

चिटपाखराला प्यायलाही पाण्याचा थेंब नाही. जनावरेच काय माणसांचा घसा कोरडा पडला होता. जमिनीतच पाणी नसल्याने प्रशासन देखील काही करू शकत नव्हतं. पण पुंडलिक अंभोरेंना गावातील वयस्कर व्यक्तीने सांगितलं त्या डोंगरातल्या जागेवर खोदा… पुढं जे घडलं त्याने तथाकथित शिक्षित लोकांच्या ज्ञानावरच प्रश्नचिन्ह निर्माण केलं. पाहा 1972 च्या दुष्काळातील आठवण राईट अँगल मराठीचे संपादक सागर गोतपागर यांच्या या विशेष रिपोर्टमधून…..

72च्या दुष्काळात 10बोअर फेल; गावकऱ्यांनी अशी शक्कल लढवली की भलेभले अधिकारीही झाले थक्क! । Maharashtra Drought 1972

“72च्या दुष्काळात मी 24 वर्षांचा होतो. जनावरांनाच काय, माणसांना प्यायलाही पाणी नव्हतं. आम्ही गावात दहा बोअरवेल पाडल्या. दहाच्या-दहा बोअरवेल फेल गेल्या. पाण्याची समस्या कशी दूर करायची, या चिंतेत आम्ही सर्वजण होतो.”

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील महाल पिंपरी या गावाचे तत्कालीन सरपंच पुंडलिक अंभोरे 1972 च्या दुष्काळातील ही आठवण सांगतात. तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी दुष्काळी गावांना युद्धपातळीवर मदत करण्याचा आदेश दिला होता. त्यानुसार त्यांनी गावातील पाणीटंचाईची समस्या प्रशासनाच्या कानावर घातली. भले-भले अभियंते आणि अधिकारी गावात येऊन गेले. मात्र त्यांनाही या समस्येवर मार्ग काढता आला नाही. अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांना सांगितलं, “तुम्हाला गावात कुठे पाण्याचा शोध लागला, तर आम्हाला कळवा. त्यावेळी आम्ही तुम्हाला मदत करू.”

पुढे बोलताना पुंडलिक अंभोरे सांगतात, “गावातील जुनी जाणती मंडळी पुढे आली. त्यांनी सांगितलं “पूर्वीपासून जवा-जवा दुष्काळ पडायचा, तवा-तवा आम्हाला त्या डोंगरातल्या झिऱ्यानं जगवलं. आम्ही तिथ खोदलं तर पाणी मिळायच. आमची जनावरं गुरं तसेच माणसं त्या पाण्यावर जगायची. अनेक वर्षे दुष्काळात आम्हाला त्या झऱ्याने जगवलंय तुम्ही त्या डोंगरात जाऊन खोदा. आपल्या अख्ख्या गावाची तहान भागेल.” गावातील वृद्धांनी पुंडलिक अंभोरे यांना पाणीटंचाई दूर करण्याचा जुनाच मार्ग दाखवला. आधुनिक युगातील तथाकथित शिक्षित लोकं या समस्येवर मात करण्यात अपयशी झाले होते. पण गावातील या मंडळींनी गावाला जगण्याचा नवा मार्ग दाखवला.

अनेक वर्षांपासून त्या झऱ्याकडे कुणी फिरकलं नव्हतं. पुंडलिक अंभोरे ग्रामस्थांसह त्या ठिकाणी पोहोचले. लोकांनी श्रमदान करत खोदकाम सुरू केलं. आणि अवघ्या सात फुटांवर पाणी लागलं. बघता-बघता खोदलेला झरा ओसंडून वाहू लागला. झऱ्यातून वाहणाऱ्या पाण्यासोबतच ग्रामस्थांच्या चेहऱ्यावरही आनंद ओसंडून वाहू लागला. तोपर्यंत दुपार झाली होती. ही आनंदाची बातमी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना सांगावी, म्हणून सरपंच पुंडलिक अंभोरे स्वतः त्यांच्या कार्यालयात पोहोचले. त्यावेळी एस. कुमार हे मुख्य कार्यकारी अधिकारी होते. ते आपल्या लवाजम्यासह गावात पोहोचले. ग्रामस्थांना वाटलं, आता अधिकारी खुश होतील. गावात पाणी नेण्यासाठी निधी जाहीर करतील आणि आपल्या गावाची पाण्याची समस्या कायमची सुटेल. मात्र, ग्रामस्थांची घोर निराशा झाली. अंभोरे सांगतात, “सीईओ म्हणाले, या झऱ्यात तुम्ही पाणी ओतलं असेल. अख्ख्या गावात काय, संपूर्ण परिसरात पाण्याचा थेंब नसताना या डोंगरात पाणी कसं असेल? तुम्ही हे पाणी उपसा. पुन्हा पाणी लागलं, तर आम्हाला बोलवा.” असं म्हणून ते निघून गेले.

पुंडलिक अंभोरे हार मानायला तयार नव्हते. त्यांनी कच्ची घाटी गावातील बंडू कारभारी यांचं घर गाठलं. बंडू कारभारी हे गावातील श्रीमंत व्यक्ती होते. त्यांना संपूर्ण हकीकत सांगून झऱ्यातील पाणी उपसण्यासाठी इंजिनची गरज असल्याचं अंभोरे यांनी सांगितलं. यावर बंडू कारभारी म्हणाले, “अरे येड्या, कुठे पाण्याचा पत्ता नाही. तुला कसं पाणी मिळालं?” त्यावर अंभोरे म्हणाले, “काका, आम्हाला जुन्या माणसांनी सांगितलं. त्या ठिकाणी पाणी मिळालं आहे.” बंडू कारभारी यांनी इंजिन दिलं. त्यासोबत ड्रायव्हरही दिला. हे सर्व घेऊन पुंडलिक अंभोरे दुसऱ्या दिवशी पुन्हा त्या झऱ्यावर पोहोचले. इंजिन जोडण्यात आलं. सकाळी अकराच्या सुमारास ते पुन्हा सीईओंच्या कार्यालयात पोहोचले. सीईओ कामात होते. त्यांनी दुपारी एक वाजता येतो, असं सांगितलं. अंभोरे पुन्हा गावात परतले. संपूर्ण गाव झऱ्याच्या काठावर अधिकाऱ्याची वाट पाहत उभं राहिलं. अखेर अधिकारी पोहोचले. इंजिनाने पाणी उपसण्यास सुरुवात केली. आणि त्यानंतर जे घडलं, ते पाहून सगळेच आश्चर्यचकित झाले. जसजसं पाणी उपसलं जात होतं, तसतशा खालून पाण्याच्या उकळ्या फुटत होत्या. हे पाहून सीईओंनी डोक्यावर हात मारला. ते म्हणाले, “कमाल आहे तुमची! भल्या-भल्यांना जे जमलं नाही, ते तुम्ही करून दाखवलं.” त्याच क्षणी त्यांनी त्या काळातील सुमारे 70 हजार रुपयांचा पाइपलाइनसाठीचा निधी मंजूर केला. पाइपलाइनचं काम सुरू झालं आणि अखेर महाल पिंपरी गावाची पाण्याची समस्या सुटली. यानंतर तळं बांधण्याचं रोजगार हमीचं कामही सुरू झालं. या कामावर सुमारे सहा हजार लोक काम करत होते. गावात सुकडीचा डेपो उभा राहिला. लोकांना धान्य मिळू लागलं. दुष्काळाची झळ कमी होऊ लागली आणि महाल पिंपरीतील लोक पुन्हा आनंदाने जगू लागले.

1972 Drought Maharashtra, 1972 Maharashtra drought story, 1972 चा दुष्काळ, १९७२ दुष्काळ, drought history Maharashtra, drought water crisis, Maharashtra Drought 1972, Maharashtra drought story, Maharashtra ground report, Right Angle Marathi, Rural Maharashtra, traditional water sources, village water crisis, water conservation Maharashtra, गावकऱ्यांचे श्रमदान, छत्रपती संभाजीनगर जिल्हा, छत्रपती संभाजीनगर दुष्काळ, झऱ्यातून पाणी, डोंगरातील झरा, दुष्काळाची कहाणी, पाणीटंचाईवर उपाय, महाराष्ट्रातील दुष्काळ, महाल पिंपरी गाव, महाल पिंपरी दुष्काळ, महाल पिंपरी पाणीटंचाई, श्रमदानातून पाणी

Team right angle news

Similar Posts

View All

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत