उष्माघातापासून सावधान; महापालिकेचे नागरिकांना आवाहन

पिंपरी । राईट अँगल 

शहरात वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर उष्मालाटेचा धोका लक्षात घेता महापालिकेने नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. उन्हाळ्यात शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होणे, उष्माघात होणे यांसारख्या समस्या टाळण्यासाठी नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

हे करा :

नागरिकांनी दिवसभर पुरेसे पाणी प्यावे, तहान लागली नसली तरी नियमित पाणी घेणे आवश्यक आहे. घराबाहेर पडताना गॉगल, टोपी किंवा छत्रीचा वापर करावा. सूर्यप्रकाशापासून बचाव करण्यासाठी घरातील पडदे, झडपा व सनशेडचा वापर करावा. प्रवास करताना पिण्याचे पाणी सोबत ठेवावे. उन्हात काम करताना डोके, मान आणि चेहरा झाकून ठेवावा. शरीरातील पाण्याची कमतरता भासल्यास ORS, लस्सी, ताक, लिंबूपाणी, कैरीचे पन्हे यांसारख्या पेयांचा वापर करावा. उष्माघाताची लक्षणे जसे की अशक्तपणा, डोकेदुखी, चक्कर येणे दिसल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. घर थंड ठेवण्यासाठी योग्य उपाययोजना कराव्यात तसेच वेळोवेळी थंड पाण्याने अंघोळ करावी. कामाच्या ठिकाणी थंड पाण्याची सोय ठेवावी आणि शक्यतो पहाटे किंवा संध्याकाळी कामे करावीत. गरोदर महिला व आजारी व्यक्तींनी विशेष काळजी घ्यावी. तसेच प्राणी व पक्ष्यांसाठी पाण्याची व्यवस्था करावी.

हे करू नका :

उन्हात अतिकष्टाची कामे टाळावीत. दारू, चहा, कॉफी आणि थंड पेयांचे सेवन करू नये. दुपारी १२ ते ३ या वेळेत घराबाहेर जाणे टाळावे. जड, गडद आणि घट्ट कपडे घालू नयेत. जास्त तापमानात शारीरिक श्रमाची कामे टाळावीत. शिळे व उच्च प्रथिनेयुक्त अन्न खाऊ नये. लहान मुले किंवा पाळीव प्राणी बंद वाहनात ठेवू नयेत. तसेच उष्णतेच्या काळात स्वयंपाक करताना घरात योग्य वायुविजन ठेवावे.

———————————-

प्रदीप लोखंडे, संपादक, राईट अँगल

संपर्क क्रमांक : 7350266967

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *