कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी ट्रॅक्टर घेतला. पण ड्रायव्हर काम सोडून पळून गेला. मग काय ? सांगलीच्या या रणरागिणीने ट्रॅक्टरचे स्टीअरिंग सांभाळत करोडो रुपयांची उलाढाल केली. आपल्या कुटुंबाला उभे केले. वाचा उल्का पिसाळ (Ulka Pisal success story) यांची प्रेरणादायी यशोगाथा राईट अँगलच्या या विशेष ग्राउंड रिपोर्टमध्ये.Right Angle ground report
“अगं गड्याला ती जमत न्हाई पण तू बाय असून ट्रॅक्टर चालवतीयास. तुझा जीव तरी हाय का? ट्रॅक्टर चालवण्याइतका? बाई म्हणून जन्माला येवून तू वाघाची धमक दाखवतीयास. तुझ्या संसारात तुला काहीबी कमी पडणार नाही”.

परिसरातील एका वृद्ध महिलेनं वर्तवलेलं हे भविष्य सांगलीच्या (Sangli) खानापूर तालुक्यातील कुर्ली (Kurli ) येथील उल्का पिसाळ यांनी आपल्या मनगटाच्या जोरावर खरे करून दाखवले. मागे वळून पाहताना भूतकाळातील आठवणी त्यांच्या डोळ्यासमोरून झरझर सरकू लागतात. परिस्थिती अतिशय हलाखीची. कुटुंबाचा भार पेलण्यासाठी त्यांनी शेतमजुरी केली, परकर, साड्या विकल्या. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बदलावी म्हणून अशाच एका स्कीममधून त्यांनी ट्रॅक्टर खरेदी केला. यातून आपली गरिबी दूर होईल आपल्याला चांगले दिवस येतील असे वाटत असतानाच दुसरेच संकट समोर आले. शेतात ट्रॅक्टरचे चालू काम सोडून ड्रायव्हर म्हणाला पळून गेला. पण हात पाय गाळून बसतील त्या उल्का पिसाळ कसल्या? तू गेलास तर जा ? तू गेलास म्हणून मी ट्रॅक्टर उभा करून थोडीच ठेवणार हाय” ? असे म्हणून त्यांनी नव्हे आव्हान स्वीकारले. कमरेला पदर खोचून बांगड्या घातलेल्या हातांनी त्यांनी ट्रॅक्टरचे स्टीअरिंग सांभाळले. उल्का पिसाळ यांनी ट्रॅक्टरसोबतच संसाराची ड्रायव्हर सीट यशस्वीपणे पेलली. त्यांनी स्वतःच्या शेतात ट्रॅक्टरचा कसून सराव केला. काही दिवसातच ट्रॅक्टर चालवण्याचे कौशल्य आत्मसात केले. त्या कुशलपणे नांगरणी तसेच इतर मशागतीची कामे करू लागल्या. पण एवढ्यावरच त्यांची परीक्षा संपली नाही. पुढे नवेच संकट समोर आले. बाईला मशागतीची कामे द्यायला लोक कच खायला लागले? बाई नांगरट कशी करणार असा प्रश्न लोकांनी उपस्थित केला. यावर “तुमचे काम योग्य झाले तर तुम्ही मला पैसे द्या अन्यथा देऊ नका” अशी विनंती त्यांनी केली. जिद्द चिकाटी आणि आत्मविश्वासाने त्यांनी लोकांचा दृष्टीकोनच बदलला. परिसरातील लोकांना त्यांनी केलेले काम पसंद पडू लागले. बाई ट्रॅक्टर चालवते हे पाहायला लोक शेतात गर्दी करायचे. आश्चर्य व्यक्त करायचे. पुढे त्यांनी विहिरीवरचे दगड भरणे यासह इतर ट्रॅक्टरची कामे केली. यातून आपल्या फाटक्या संसाराला हातभार लावला. पुढे त्यांनी प्रकृतीच्या कारणास्तव ट्रॅक्टर विकून टाकला. पण त्या थांबल्या नाहीत. वेगवेगळ्या क्षेत्रात त्यांनी आपली घोडदौड सुरूच ठेवली.

आपल्या परिस्थितीसोबत दोन हात करताना उल्का पिसाळ यांना उमेद (Umed Abhiyan) अभियानाची मोठी साथ लाभली. त्यांच्या स्वतःच्या पायावर उभे राहण्याच्या स्वप्नाला उमेद अभियानाचे पंख मिळाले. ज्याच्या जोरावर त्यांना यशस्वी भरारी मारता आली. उद्योग उभारताना त्यांना ज्या ज्या वेळी भांडवलाची गरज भासली त्या त्या वेळी बचतगटाच्या माध्यमातून त्यांना भांडवल उपलब्ध झाले. हिंदवी प्रभागसंघाकडून (prabhag sangh) त्यांनी मार्गदर्शन मिळाले. यातून त्यांनी आटा चक्की सुरु केली. आटा चक्की व्यवसाय लोकांच्या विश्वासास पात्र ठरला. या व्यवसायाला ग्राहकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. आटा चक्की चालवणे हे काम देखील केवळ पुरुषाचे समजले जात होते. पण त्या दळण दळण्यास स्वतः उभा राहिल्या. चक्कीच्या या चाकाबरोबरच त्यांच्या संसाराच्या चाकाला देखील गती मिळाली. हा व्यवसाय वाढवत त्यांनी चटणी डंग, शेवया मशीन सुरु केली. कष्टाने पै पै जमा करून त्यांनी शेती तसेच उद्योग क्षेत्रात केलेल्या प्रगतीचे आकडे त्या स्वतः सांगतात “२०१५ ला बचत गटाच्या माध्यमातून छोटीशी बचत करायला सुरवात केली. पाण्याचे दुर्भिक्ष असल्याने बोअर मारली. मोटार बसवण्यासाठी ५० हजार रुपयांचे कर्ज घेतले. कष्ट तसेच बचतीच्या पैशातून पहिल्यांदा १० गुंठे जमीन खरेदी केली. ते पैसे फिटल्यानंतर पुन्हा १ एकर जमीन खरेदी केली. मुलीचे लग्न केले. बचत गटाचे कर्ज, सोने गहाण कर्ज तसेच हात उसने पैसे घेत पुन्हा तब्बल २० लाख रुपयांची जमीन खरेदी केली. जमीन झाली पण स्वतःचे पाणी नव्हते. दुसऱ्याचे पाणी घेऊन ऊस लावला. आलेले पैसे तसेच बचत गटाचे कर्ज यातून तब्बल ५० बाय ४० ची विहीर पाडली. या विहिरीसाठी सुमारे २२ लाख रुपये इतका खर्च झाला”.

आज त्यांना ऊस (Sugarcane farming ) शेतीतून वर्षाला चांगला नफा होतो. त्यातूनच त्यांनी आजपर्यंत घेतलेली सर्व कर्जे वेळेत फेडली आहेत. त्यांची स्वतःची ७ एकर जमीन आहे. त्यांनी आजपर्यंत केलेल्या आर्थिक उलाढालीचा आकडा जवळपास एक कोटी रुपयांपर्यंत पोहचला आहे. उल्का पिसाळ यांनी शेती, लघु उद्योग, पशुपालन या उद्योगातून आपल्या संसाराला गती दिली. एकेकाळी लोकांच्या शेतात शेतमजुरी करणाऱ्या उल्का पिसाळ यांनी गावातून पहिल्यांदा आपला ऊस कारखान्याला घालविण्याचा बहुमान मिळवला. त्यांनी प्राप्त केलेल्या यशामागील नेमके सूत्र काय असा प्रश्न त्यांना विचारला असता त्या सांगतात, “मी कुणाचा एक रुपया बुडवला नाही तसेच माझाही एक रुपया कुणाला सोडलेला नाही. माझ्या कष्टाचा रुपयान रुपया मी घेतला, मी पण कुणाचा हरामचा पैसा घेतलेला नाही.”
एकेकाळी दुसऱ्याच्या शेतात मजुरी करणाऱ्या उल्का पिसाळ आज स्वतःच्या पायावर उभ्या राहिल्या आहेत. त्यांचे जीवनमान उंचावले आहे. त्यांना गावात सामाजिक सन्मान मिळतो. त्यांचा आत्मसन्मान वाढलाय. लिंगभेदाला सुरुंग लावत उल्का पिसाळ यांनी मिळवलेले दैदीप्यमान यश इतर स्त्रियांसाठी मैलाचा दगड ठरणार आहे…..
