पिंपरी-चिंचवडमध्ये दारूबंदीचा फज्जा; खुलेआम विक्री सुरूच ।

पोलिस प्रशासन कारवाई करणार का ? स्थानिक नागरिक त्रस्त

पिंपरी । राईट अँगल । विशेष प्रतिनिधी

उद्योगनगरी म्हणून ओळख असलेल्या पिंपरी चिंचवड शहरातील ५० ते ६० झोपडपट्टीसह अन्य भागांत सध्या खुलेआम गावठी आणि अवैध दारू विक्री सुरू आहे. पोलीस प्रशासनाकडून केवळ कारवाईचा दिखावा केला जात असून, प्रत्यक्षात मात्र पोलीस या गंभीर समस्येकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून केला जात आहे.

पुण्यासह दापोडी, फुगेवाडीत विषारी गावठी दारूमुळे तब्बल २० पेक्षा अधिक निष्पाप नागरिकांचा नाहक बळी गेला आणि संपूर्ण पिंपरी-चिंचवड शहर हादरून गेले आहे.अनेकांचे संसार उघड्यावर पडल्यानंतर आणि सर्वसामान्यांचा आक्रोश रस्त्यावर आल्यानंतर तरीही पोलिस अद्यापही ढिम्म आहे. पिंपरी-चिंचवड पोलिसांना अद्यापही जाग आली नाही, अशी स्थिती आहे.

शहरातील झोपडपट्टी भागातील शेकडो पान टपऱ्या, बैठी घरे, नदीकाठचे झोपडपट्टी परिसर, मोकळी मैदाने आणि औद्योगिक वसाहतींच्या लगतच्या भागात गावठी दारू तसेच देशी-विदेशी दारूची अवैध विक्री जोरात सुरू आहे. अनेक कामगार आणि तरुण वर्ग या अवैध दारूच्या विळख्यात अडकत चालला असून, यामुळे अनेक संसार उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत. तसेच, या भागांमध्ये छुप्या पद्धतीने दारू पिणाऱ्यांची गर्दी वाढत असल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

शहरात विविध ठिकाणी पडलेला दारूच्या पिशव्यांचा खच

शहरातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत हा अवैध व्यवसाय राजरोसपणे सुरू आहे. ‘हप्तेखोरी’मुळेच या दारू विक्रेत्यांचे मनोबल वाढले की काय अशा चर्चा नागरिकांमध्ये आहे. एखादी तक्रार आल्यास पोलीस केवळ जुजबी कारवाई करतात आणि दुसऱ्याच दिवशी पुन्हा हा धंदा पूर्ववत सुरू होतो, अशा तक्रारी नागरिक करत आहेत. पोलिसांच्या या ‘बघ्याची भूमिका’ घेण्यामुळे परिसरातील महिला आणि ज्येष्ठ नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

नदीकाठच्या मोकळ्या जागा आणि झोपडपट्ट्यांमध्ये रात्रीच्या वेळी मद्यपींचा धिंगाणा वाढला आहे. यामुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. किरकोळ वादातून मारामारी आणि चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी या प्रकरणात तातडीने लक्ष घालून दोषी पोलीस कर्मचाऱ्यांवर आणि अवैध दारू विक्रेत्यांवर कडक कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी पिंपरी-चिंचवडमधील त्रस्त नागरिकांकडून केली जात आहे.

——————

नागरिकांच्या तक्रारी कचऱ्याच्या डब्यात

हे भीषण कांड अचानक घडलेले नाही. दापोडी, फुगेवाडीसह शहरातील विविध भागांतील स्थानिक नागरिकांनी, महिला भगिनींनी, विविध संघटना, सामाजिक कार्यकर्ते यांनी अवैध दारू व्यवसायाविरोधात पोलिसांकडे वारंवार लेखी व तोंडी तक्रारी केल्या होत्या. दारूच्या अड्ड्यांमुळे वस्त्यांमध्ये गुंडगिरी वाढली आहे, माता-भगिनींची सुरक्षा धोक्यात आली आहे. नागरिकांच्या तक्रारीनंतरही पोलिसांनी या गंभीर तक्रारींकडे सातत्याने डोळेझाक केली, असे नागरिक सांगत आहेत.

—————

७२ झोपडपट्ट्यांमध्ये मृत्यूचा विळखा

पिंपरी-चिंचवड शहरातील सुमारे ७२ झोपडपट्ट्यांसह अनेक उच्चभ्रू भागांच्या आडोशाला आजही गावठी दारूचे धंदे राजरोसपणे आणि खुलेआम सुरू आहेत. पोलिसांच्या नाकाखाली हा मृत्यूचा व्यापार सुरू असताना स्थानिक चौकीपासून ते वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत कोणालाच याचा सुगावा कसा लागला नाही? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

————–

कायमस्वरूपी बंद करा

पिंपरी-चिंचवडमधील संतप्त नागरिकांनी आणि सामाजिक संघटनांनी आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. “आम्हाला तात्पुरती धरपकड नको, तर शहरातील गावठी दारूचे नेटवर्क मुळासकट उपटून फेका,” अशी एकच मागणी जनतेतून होत आहे. मुख्य सूत्रधारांना आणि त्यांना पाठीशी घालणाऱ्या खाकी वर्दीतील ‘काळ्या मेंढ्यांवर’ कठोर कारवाई झालीच पाहिजे, अशी मागणी होत आहे. 
—————

या ठिकाणी अवैध धंदे असल्याचा संशय – 

निगडी स्मशानभूमी समोरील संग्रामनगर झोपडपट्टी, निगडी स्मशानभूमी मागील झोपडपट्टी, पेरूची बाग झोपडपट्टी, नवनाथ नगर, राजनगर झोपडपट्टी, इंदिरानगर झोपडपट्टी, दत्त नगर, संजय नगर, लोकमान्य अण्णाभाऊ साठे वसाहत या ठिकाणी विक्री सुरू असल्याचा संशय नागरिक व्यक्त करत आहेत. याची शहानिशा करून पाहणी करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

—————

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *