सोलापूरच्या मोहोळ तालुक्यातील शेटफळ गावात मंदिर प्रवेशाच्या मुद्द्यावरून सुरू झालेला तणाव दलित वस्तीवरील हल्ल्यापर्यंत पोहोचला. २०० ते ३०० जणांच्या जमावाने हल्ला केल्याचा आरोप असून १० जण जखमी झाले. नेमकं काय घडलं? वाचा हा ग्राउंड रिपोर्ट.

“लहानपणापासून मला आठवत नाही आमच्यातील कुणी त्या मंदिरात गेलं असेल. स्वातंत्र्याला ८० वर्षे उलटली तरीही आमच्या गावात मांग, महार-बौद्ध, चांभार, ढोर आणि वडार समाजाला मंदिरात प्रवेश करण्याचा अधिकार नाही. बाबासाहेबांनी ज्या प्रमाणे समानतेच्या हक्कासाठी काळाराम मंदिर प्रवेश केला त्याच प्रमाणे आम्ही ८ एप्रिलला मंदिर प्रवेश केला होता. त्याला सवर्ण तसेच मंदिराच्या ट्रस्टीनी मोठा विरोध केला होता. वाडवडिलांनी सुरु केलेल्या चालीरीती तोडण्यास त्यांचा विरोध होता. आम्ही या संदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रारी देखील केल्या होत्या. त्यावेळी पोलिसांनी हा वाद मिटवला पण त्यांच्या मनात हा राग धुमसत होता.”

सोलापूरच्या मोहोळ तालुक्यातील शेटफळ गावात मंदिर प्रवेशाच्या मुद्द्यावरून सुरू झालेला तणाव दलित वस्तीवरील हल्ल्यापर्यंत पोहोचला. २०० ते ३०० जणांच्या जमावाने हल्ला केल्याचा आरोप असून १० जण जखमी झाले. नेमकं काय घडलं? वाचा हा ग्राउंड रिपोर्ट.

सोलापूरच्या मोहोळ तालुक्यातील शेटफळ या गावचे नागरिक आनंद ओव्हळ शेटफळ येथील हिंसाचाराची पार्श्वभूमी सांगतात. त्यांच्या म्हणण्यानुसार, तब्बल दोनशे ते तीनशे लोकांचा जमाव मातंग तसेच बौद्ध वस्तीवर चाल करून आला. दिसेल त्याला मारहाण करू लागला. घरांवर दगडफेक केली. संजय कसबे या मातंग समाजातील कार्यकर्त्याच्या घरात जमाव शिरला. कसबे यांनी कसाबसा आपला जीव वाचवला.

विशेष म्हणजे, त्यावेळी गावात पोलीस देखील उपस्थित होते. जमाव एका तरुणाच्या अंगावर पडला आणि त्याला मारहाण सुरू होती. तेथे उपस्थित असलेले पोलीस अधिकारी आकाश शेळके यांनी त्या तरुणाचे प्राण वाचवले, असे ओव्हळ सांगतात. या जमावाकडे रॉड, काठ्या, तलवारी तसेच पेट्रोल बॉम्ब असल्याचेही ते सांगतात. या हिंसाचारात १० जण जखमी झाले असून त्यांच्यावर अजूनही सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेनंतर दलित वस्तीतील नागरिक भयभीत असल्याचे ओव्हळ सांगतात.

या हल्ल्याच्या अगोदर नेमकं काय झालं होतं, हा प्रश्नही महत्त्वाचा आहे. याबाबत आनंद ओव्हळ यांना विचारलं असता ते सांगतात, “गावात मंदिर प्रवेशापासून तणावाचीच परिस्थिती होती. २२ सप्टेंबरला नाना कापसे हे उत्तरेश्वर यांच्या शेती परिसरात शेळ्या चारत होते. त्यावेळी ‘महारा, तू आमच्या शेतात का आलास? तुला आमचा देव चालत नाही तर तुम्ही आम्हाला चालत नाही,’ असे म्हणून त्यांना शिवीगाळ केली. याबाबत समाजातील काही लोकांनी त्यांना जाब विचारला. त्यावेळी त्यांना टोळक्याने मारहाण केली. त्यावेळी पोलीस अधिकारी दीपक पाटील यांना आम्ही वाद मिटवण्याबाबत सांगितले. ‘तुम्ही घरी जा, आम्ही कायदेशीर कारवाई करतो,’ असे त्यांनी सांगितले.”

या घटनेनंतर गावात तणाव वाढल्याचे ओव्हळ सांगतात. घटनेच्या आरोपींकडून गाव बंद ठेवण्याबाबत व्हॉट्सअॅप स्टेटस ठेवण्यात आल्याचेही ते सांगतात. त्यांच्या मते, यावरून हा हल्ला पूर्वनियोजित असल्याचे दिसते. त्या दिवशी गावात पोलीस देखील उपस्थित होते. त्याच वेळी दलित वस्तीवर चालून आलेल्या जमावाने हल्ला केला. यामध्ये १० जण जखमी झाले असून मालमत्तेचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पोलिसांकडून ३७ तसेच इतर १०० लोकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून काहींना अटक करण्यात आली आहे.

या हल्ल्यातून बचावलेले संजय कसबे अजूनही भीतीच्या छायेत आहेत. मुख्य आरोपी अजूनही मोकाट असून त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याने त्यांच्यापासून जीवितास धोका असल्याचे ते सांगतात. या आरोपींविरोधात मोक्का लावून मातंग तसेच बौद्ध समाजाला न्याय देण्याची मागणी ते करतात.

“समान वागणूक मिळावी म्हणून आम्ही मंदिर प्रवेश केला. सर्व लोकांनी मिळून दलित वस्तीवर हल्ला केला. माझे देखील घर फोडले. काठ्या, कुऱ्हाडी, पेट्रोल बॉम्ब असे साहित्य होते. कट रचून मला जीवे मारण्याचा कट होता. मी वाचलो. त्यांच्यावर मोक्का लावावा. बौद्ध, मातंग समाजाला न्याय मिळावा, ही आमची मागणी आहे,” असं संजय कसबे सांगतात.

शेटफळमध्ये घडलेल्या या घटनेनंतर गावात भयान शांतता आहे. हल्ल्यानंतर दलित वस्तीतील नागरिक दहशतीच्या सावटाखाली असल्याचे दिसून येते. मंदिर प्रवेशाच्या मुद्द्यावरून आधीच तणाव निर्माण झाला होता. त्यानंतर शेळ्या चारण्यावरून झालेला वाद, त्यातून झालेली मारहाण आणि त्यानंतर झालेला जमावाचा हल्ला, अशी या संपूर्ण घटनेची पार्श्वभूमी असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.

या घटनेनंतर पोलिसांच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित होत आहेत. हल्ल्यापूर्वी तक्रारी देण्यात आल्या होत्या, तर त्याची गंभीर दखल घेतली गेली का? हल्ल्याची शक्यता असताना अतिरिक्त पोलीस बंदोबस्त का लावण्यात आला नाही? पोलिसांच्या उपस्थितीत एवढा मोठा जमाव कसा जमला? हल्लेखोरांकडे घातक शस्त्रं आली कुठून? आणि हल्ल्यानंतर कारवाई नेमकी कशी झाली, असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

महाराष्ट्रातील राजकीय नेते उठता बसता फुले-शाहू-आंबेडकरांच्या नावाचा जप करतात. पण प्रत्यक्षात आजही दलितांना मंदिर प्रवेशासाठी रक्त सांडावे लागते. तथाकथित सवर्ण समजला जाणारा समाज एका बाजूला आम्ही सामाजिकदृष्ट्या मागास आहोत हे सिद्ध करू पाहतोय, तर अशा घटनांमध्ये त्यांच्यातील तथाकथित जातीचा अहमभाव नाग गोळीतील नागाप्रमाणे उसळून वर येतोय. हे थांबणार कधी, हा खरा सवाल आहे.

Team right angle news

Similar Posts

View All

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत