पीएमआरडीए आणि महारेलमध्ये सकारात्मक निर्णय लवकरच सामंजस्य करार
पिंपरी । प्रदीप लोखंडे
यवत–राहू (राज्य मार्ग ११९) दरम्यान प्रस्तावित रेल्वे उड्डाणपूल (आरओबी) उभारणीसाठी महत्त्वाची हालचाल सुरू झाली असून, या प्रकल्पाचा मार्ग आता मोकळा झाला आहे. या पुलाचे बांधकाम ‘महारेल’ मार्फत करण्यात येणार असून, लवकरच दोन्ही संस्थांमध्ये सामंजस्य करार करण्यात येणार आहे.
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणचे महानगर आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली आकुर्डी येथील मुख्यालयात झालेल्या बैठकीत याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात आला.
या बैठकीला ‘महारेल’चे व्यवस्थापकीय संचालक राजेश जैस्वाल, पीएमआरडीएचे मुख्य अभियंता शिवप्रसाद बागडी यांच्यासह मुदसर भट, उदयकुमार किर्ती, दिलीप काशीद, हर्षवर्धन इंगवले आणि आशीष धर्माधिकारी आदी अधिकारी उपस्थित होते.
यवत–राहू परिसरातील वाहतूक कोंडी कमी करण्यास आणि रेल्वे फाटकामुळे होणारा वेळेचा अपव्यय टाळण्यासाठी हा उड्डाणपूल महत्त्वाचा ठरणार आहे. पुणे महानगर क्षेत्र ‘रेल्वे फाटकमुक्त’ करण्याच्या दृष्टीने हा प्रकल्प एक मोठे पाऊल मानले जात असून, प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर नागरिकांचा प्रवास अधिक जलद आणि सुरक्षित होणार आहे.
——————————
बातमीसाठी संपर्क : 7350266967
