संकेत पाटील /तासगाव
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांचे आमरण उपोषणाचा आज पाचवा दिवस आहे. त्यांच्या तब्येतीत घसरण होत असूनही शासनाकडून ठोस निर्णय होत नसल्याने मराठा समाजात संताप आहे.

या पार्श्वभूमीवर तासगाव तालुका सकल मराठा समाजाने आज तहसीलदारांना निवेदन देऊन जरांगे पाटील यांच्या लढ्याला जाहीर पाठिंबा दिला.
निवेदनातील ४ प्रमुख मागण्या:
१. सगेसोयरे अधिसूचनेचे कायद्यात रूपांतर करून सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यावे.
२. हैदराबाद, मुंबई आणि सातारा गॅझेटमधील नोंदींच्या आधारे तात्काळ आरक्षण लागू करावे.
३. मराठा आंदोलकांवरील सर्व गुन्हे मागे घ्यावेत.
४. शासनाच्या प्रतिनिधींनी तात्काळ उपोषणस्थळी जाऊन चर्चा करून उपोषण सोडवावे.

दरम्यान, शासनाने मराठा समाजाच्या भावनांचा अंत पाहू नये आणि तात्काळ निर्णय घ्यावा, अन्यथा तासगाव तालुक्यात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा सकल मराठा समाजाच्या वतीने देण्यात आला आहे. जरांगे पाटील यांच्या जीवाला काही बरे-वाईट झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी सरकारची असेल, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

यावेळी तहसील कार्यालयासमोर मोठ्या संख्येने मराठा बांधव उपस्थित होते. “एक मराठा, लाख मराठा” आणि “आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. हे निवेदन तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना पाठवण्यात आले आहे.
