संकेत पाटील/तासगाव
पुण्यातील सामाजिक कार्यकर्ते विद्यानंद बापट यांच्यामुळे गेल्या काही दिवसांपासून डॉल्बीचा मुद्दा पुन्हा तापला असला तरी, सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील चिंचणी गावाने तर दोन वर्षांपूर्वीच यावर कायमचा तोडगा काढला आहे. चिंचणीचा हा ‘डॉल्बी बंदी पॅटर्न’ आता राज्याने आदर्श म्हणून घेणे गरजेचे आहे.
कागदावर नाही, प्रत्यक्षात अंमलबजावणी
सन २०२३-२४ मध्ये चिंचणी ग्रामपंचायतीने ग्रामसभेत डॉल्बी बंदीचा लेखी ठराव मंजूर केला. राज्यभरात असे अनेक ठराव झाले, पण राजकीय श्रेयवाद आणि दबावामुळे ते २-३ महिन्यातच गुंडाळले गेले. चिंचणी मात्र याला अपवाद ठरले. गेली २ ते ३ वर्षे या गावात लग्न समारंभ असो, गणेशोत्सव, यात्रा किंवा कोणताही सण-उत्सव असो, कर्णकर्कश डॉल्बीला पूर्ण फाटा दिला जातो. त्याजागी पारंपारिक ढोल-ताशा, सनई-चौघडा या वाद्यांना प्राधान्य दिले जाते. हा ठराव आजही तितक्याच कडकपणे पाळला जातो.

जीवघेणा डॉल्बी आणि जागरूक चिंचणीकर
सांगली जिल्ह्यात कवठेएकंद आणि दुधारी येथे डॉल्बीच्या दणदणाटात दोन-तीन तरुणांचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुर्दैवी मृत्यू झाला आहे. डॉल्बीचे हे जीवघेणे दुष्परिणाम चिंचणीकरांनी वेळीच ओळखले आणि गावच्या आरोग्यासाठी हा धाडसी निर्णय घेतला.
आम्ही निर्णय गावाच्या भल्यासाठी घेतला – सदाशिव माळी
“गावात लहान मुले, वयोवृद्ध आणि हृदयरुग्णांना डॉल्बीचा प्रचंड त्रास होत होता. लग्नात तर भांडणं व्हायची. म्हणून आम्ही सर्व ग्रामस्थांना विश्वासात घेऊन ग्रामसभेत एकमुखी ठराव केला. कुणावरही जबरदस्ती नाही, पण गावाच्या हितासाठी सर्वांनीच सहकार्य केले. आज गावात शांतता आहे आणि उत्सवही तितक्याच आनंदात पार पडतात. हाच आदर्श इतर गावांनी घ्यावा.”
- सदाशिव माळी, तत्कालीन सरपंच, चिंचणी
महाराष्ट्रासमोर आदर्श
चिंचणीमध्ये लोकसहभागातून आणि स्वयंशिस्तीतून डॉल्बीबंदी झाली आहे. जिथे राजकीय बळाचा वापर करून असे ठराव घ्यावे लागतात, तिथे चिंचणीकरांनी केवळ जनजागृतीतून हा बदल घडवून आणला आहे.
त्यामुळे प्रश्न असा आहे की, जे चिंचणीकरांना जमले, ते इतर गावांना आणि शहरांना का जमणार नाही? लोक आपापल्या गावात चिंचणी पॅटर्न राबवून महाराष्ट्र डॉल्बीमुक्त करणार का? हे येणारा काळच ठरवेल.
