Ashok kharat प्रकरणाने बुवाबाजीचा घृणास्पद प्रकार महाराष्ट्रासमोर आला. बुवाबाजी अंधश्रद्धेतून महिलांचे शोषण होऊ नये म्हणून आयुष्य वाहून घेतलेल्या भास्कर सदाकाळे यांचा जीवनप्रवास वाचा राईट अँगलच्या या विशेष रिपोर्टमध्ये…
“आईच्या अंगात यायचं. अंगात आलं की जोरजोरात घुमायची. बायका हळद कुंकू साखर घेऊन यायच्या. आम्हाला आठवड्याला दहा पंधरा किलो साखर मिळायची. काय जणी गुण आला म्हणून साडी घेऊन यायच्या. आईला साडी विकत घ्यायची वेळ कधीच आली नाही. मी एक दिवस तासगावच्या वंदे मातरम चौकात डॉ. नरेंद्र दाभोळकरांचे (Dr. Narendra Dabholkar) व्याख्यान ऐकलं. वाचनाची आवड असल्याने तिथे ठेवलेलं एक पुस्तक मी विकत घेतलं. ते पुस्तक वाचल्यावर मला अंगात येण्यामागील कारण समजलं”.

त्यांनी आईला अंगात येण्याबाबत स्पष्ट विचारणा केली. आईने सांगितलं मला काय होतय हेच कळत न्हाय. ते आईला घेऊन मानसोपचार तज्ज्ञाकडे गेले. त्यांच्या आईला हिस्टेरिया (Histeria)नावाचा रोग झाला होता. डॉक्टरांनी योग्य उपचार केले. त्यांची आई यातून बरी झाली.
स्वतःच्या घरात घडलेल्या या प्रसंगानंतर भास्कर सदाकाळे अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या(Andhashraddha nirmulan samiti) कामाकडे आकर्षित होऊ लागले. याच दरम्यान परिसरातील अनिस कार्यकर्ते राजाराम मस्के त्यांना भेटले. त्यांचे काम पाहून त्यांनी अनिसमध्ये काम करण्याचा मनोदय व्यक्त केला. त्यानंतर त्यांनी कराडे काका, प्रताप घाडगे यांची भेट करून दिली. राजाराम मस्के त्यांना डॉ. प्रदीप पाटील यांच्याकडे घेऊन गेले. डॉक्टरांनी त्यांना काय काम करू शकतो विचारले. यावर सोंग, नकला, नाटक आणि भाषण करण्याची कला अवगत असल्याचे सांगितले. त्याच क्षणी डॉक्टरांनी कामाला सुरुवात करा असे सांगितले. त्या क्षणाला काम सुरू केले ते भास्कर सदाकाळे आजपर्यंत थांबले नाहीत.

जिल्ह्यातील ३०० भोंदू बाबांचा त्यांनी भांडाफोड केलाय. १७५ महिलांचे जटानिर्मूलन केले आहे. अनेक केसेस मध्ये ते फिर्यादी आहेत. त्यांनी या कामामध्ये स्वतःला वाहून घेतलंय. अनेक प्रसंग जीवघेणे ठरले. बुवा बाबांची दुकानदारी बंद करण्याच्या कामात त्यांनी स्वतःला वाहून घेतले. अशा भोंदू बाबांच्या दरबारात महिला आर्थिक शोषणाबरोबरच लैंगिक शोषणाला बळी पडत होत्या.
वरवरचे काम करणे त्यांना रुचत नव्हते. अंधश्रद्धेच्या कारणांच्या खोलात गेले तरच हि समस्या समूळ नष्ट होणार होती.
याबाबत ते एक उदाहरण सांगतात एका गावात शेतकऱ्याने गोचीड झाल्या म्हणून बैलाला विषारी पावडर लावली होती. त्याच्या संसर्गाने दोन्ही बैल मेले. भावाने करणी करून बैल मारले असा त्याचा समज झाला. यातून मारहाणीचा प्रसंग उभा राहिला. भास्कर यांनी दोघांना समोर बसवले. बैलाच्या मृत्यूच्या कारणांचा खुलासा केला. वाद संपला. एकमेकांना संपवायला निघालेल्या भावांचा वाद मिटला.
त्यांच्या आयुष्यात घडलेला देवरुसपण पाहणाऱ्या धुर्पदा कांबळेचा प्रसंग तर मजेशीर आहे. तासगाव तालुक्यात धुर्पदा कांबळे ही बाई देवरुस पण पाहायची. ग्रामीण भागातील विविध समस्यांवर अंधश्रद्धेद्वारे उपाय करण्याचा दावा करत होती. एक दिवस भास्कर सदाकाळे म्हैस चोरीला गेली म्हणून स्वतः गिऱ्हाईक बनून तिच्याकडे गेले. तिला समस्या सांगितली. तिने क्षणात कौल लावला. तिच्या अंगात देवी आली. ती घुमू लागली.
अहं अहं अहं अहं
आये…माझी म्हस गील्या
तुझी म्हस कुठनं घीतली तुला म्हायीत होतं का न्हाय ?
आये मी बाजारातनं घीतली हुती, बाजारातनं गीली न्हाय, दावणीतन गील्या तुला कळना व्ही
उलट बोलू नगुस झाडाला त्रास होतुय
आये एरंडोलीत घीतली हुती
देवीला सोन घे मग सांगते तिथे जा तुला म्हस सापडत्या
अहं अहं अहं अहं
एव्हाना तिथे लोक जमले होते. भास्कर सदाकाळे (Bhaskar Sadakale)म्हणाले माझ्याकडे म्हसच न्हाय हे तुला कसं कळल न्हाय.
तिने शिव्या शाप द्यायला सुरवात केली. पोलिसांची मदत घेऊन भास्कर सदाकाळे यांनी तिची जट कापली. ती परडीत नाचली. तुला रगतपिती भरंल. साडी नेसून माझ्याकडे माफी मागायला येशील. तिने असा शाप दिला.

तिच्या या शापाचा उपयोग देखील त्यांनी प्रबोधनासाठीच केला. एक दिवस साडी नेसून ते या गावात दाखल झाले. भास्कर सदाकाळे साडी नेसून गावात आला असे माईकवरून अलाउन्स करण्यात आलं. धुर्पदाचा शाप खरा ठरला म्हणून गाव जमा झाला. जमलेल्या गावासमोर भास्कर सदाकाळे यांनी प्रबोधनपर पथनाट्य सादर केले. लोक खो खो हसायला लागले. लोकांच्या डोक्यात प्रकाश पडला.
विज्ञान बोधवाहिनीच्या(Vidnyan Bodh wahini) माध्यमातून त्यांनी शाळांमध्ये हजारो कार्यक्रम केले. तीन वेळा महाराष्ट्र (Maharashtra) पिंजून काढला. प्रत्यक्ष बुवा बाबांवर अनेक केसेस केल्या. त्यांचा भांडाफोड केला. हे करत असताना स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष झाले. त्यांच्या घरची परिस्थिती आजही बेताचीच आहे. समाजातील चांगल्या लोकांच्या मदतीची त्यांना अपेक्षा आहे. कारण हा भास्कर उपेक्षित राहिला तर विज्ञानाचा प्रकाश खेडोपाड्यात पोहचवणारा दुसरा भास्कर जन्माला कसा येईल
