शालेय अभ्यासक्रमातून मराठा साम्राज्याचा नकाशा वगळला; सांगलीच्या वकिलांनी थेट केंद्र सरकारकडे केली तक्रार
मुंबई : शालेय अभ्यासक्रमातून मराठा साम्राज्याचा (Maratha Empire) विस्तार दर्शवणारा नकाशा वगळण्यात आल्याच्या मुद्द्यावर थेट केंद्र सरकारकडे अधिकृत तक्रार दाखल करण्यात आली आहे. सांगली जिल्ह्यातील सोनसळ (Sonsal) येथील ॲड. विश्राम अशोक कदम यांनी एनसीईआरटी (NCERT) तसेच शिक्षण मंत्रालयाकडे ही तक्रार दाखल केली असून संबंधित निर्णयाचा पुनर्विचार करण्याची मागणी केली आहे.
कदम यांच्या तक्रारीनुसार, इतिहासकारांच्या मते मराठा साम्राज्याचा विस्तार “अटक ते कटक” पर्यंत होता, जो भारतीय इतिहासातील एक महत्त्वपूर्ण टप्पा मानला जातो. अशा महत्त्वाच्या ऐतिहासिक घटकाचे प्रतिनिधित्व करणारा नकाशा अभ्यासक्रमातून वगळल्यास विद्यार्थ्यांना अपूर्ण किंवा दिशाभूल करणारी माहिती मिळू शकते, अशी चिंता व्यक्त करण्यात आली आहे.
ॲड. कदम यांनी आपल्या निवेदनात नमूद केले आहे की, मराठा साम्राज्याने परकीय आक्रमणांना प्रभावीपणे प्रतिकार करून स्वराज्याची संकल्पना बळकट केली असून स्थानिक प्रशासनाची मजबूत पायाभरणी केली होती. त्यामुळे या इतिहासाचे अचूक प्रतिनिधित्व शैक्षणिक अभ्यासक्रमात असणे आवश्यक आहे.
तक्रारीत केंद्र सरकारकडे प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत :
- नकाशा वगळण्यामागील कारणांची अधिकृत माहिती जाहीर करावी, तसेच संबंधित निर्णयाचा तात्काळ पुनर्विचार करावा आणि विद्यार्थ्यांना संपूर्ण व वस्तुनिष्ठ इतिहास मिळावा यासाठी नकाशा पुन्हा अभ्यासक्रमात समाविष्ट करावा अशी मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, सदर तक्रार सध्या “अंडर प्रोसेस” स्थितीत असून दि. २४ मार्च २०२६ रोजी त्यावर कार्यवाही सुरू झाल्याची माहिती मिळाली कदम यांनी दिली आहे. शिक्षण मंत्रालयातील धोरण विभागाकडे हा विषय विचाराधीन असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
दरम्यान, या प्रकरणामुळे शैक्षणिक वर्तुळात तसेच सामाजिक स्तरावर चर्चा रंगण्याची शक्यता असून इतिहासाच्या अचूकतेबाबत अधिक जागरूकता निर्माण होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
