गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि सुसज्ज आरोग्य सुविधांसाठी भरघोस तरतूदीचा अभाव  

नगरसेविका नंदिनी सिद्धार्थ धेंडे यांनी महापालिका अर्थसंकलपावर मंडळी भूमिका  

पुणे : राईट अँगल

पुणे महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पात शिक्षण आणि आरोग्य या मूलभूत क्षेत्रांकडे अपेक्षित लक्ष दिले गेले नसून, गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि सुसज्ज आरोग्य सुविधांसाठी आवश्यक त्या भरघोस तरतुदींचा अभाव असल्याची टीका प्रभाग क्रमांक दोनच्या नगरसेविका नंदिनी सिद्धार्थ धेंडे यांनी केली. सर्वसाधारण सभेत अर्थसंकल्पावर भूमिका मांडताना त्यांनी प्रशासनाच्या प्राधान्यक्रमांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

धेंडे म्हणाल्या की, गेल्या चार वर्षांपासून नागरिकांना अर्थसंकल्पाची प्रतीक्षा होती. मांडलेल्या अर्थसंकल्पातील काही बाबी सकारात्मक असल्या तरी शिक्षण आणि आरोग्य क्षेत्राकडे दुर्लक्ष झाल्याचे स्पष्ट दिसते. भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयाचा अनेकांनी उल्लेख केला असला तरी या महाविद्यालयाला स्वतःचे स्वतंत्र रुग्णालय नाही, ही गंभीर बाब आहे. सध्या हे महाविद्यालय कमला नेहरू रुग्णालयाशी संलग्न असले तरी त्या रुग्णालयातील अनेक विभाग पीपीपी तत्वावर चालत असून, अतिदक्षता विभाग, एनआयसीयू, शवविच्छेदन यांसारख्या मूलभूत सुविधा उपलब्ध नाहीत. त्यामुळे वैद्यकीय शिक्षण आणि उपचार व्यवस्था खासगीकरणाकडे झुकत असल्याची भीती त्यांनी व्यक्त केली.

या महाविद्यालयासाठी राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने (एनएमसी) तीन वेळा नोटिसा देत परवानगी रद्द का करू नये, असा सवाल उपस्थित केला आहे. अशा परिस्थितीत सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे असताना, त्या दिशेने ठोस पावले उचलली जात नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. अनेक बाबतीत ससून रुग्णालयावर अवलंबून राहावे लागत असल्याने महापालिकेच्या आरोग्य व्यवस्थेतील उणिवा उघड होत असल्याचे त्यांनी नमूद केले. आरोग्य क्षेत्रासाठी करण्यात आलेली १८० कोटी रुपयांची तरतूद अत्यंत तोकडी असून, ती एकूण अर्थसंकल्पाच्या केवळ एक टक्क्यांच्या आसपास आहे. देशाच्या एकूण जीडीपीपैकी किमान साडेसहा टक्के खर्च आरोग्यावर होणे अपेक्षित असताना, पुण्यातील नागरिकांसाठी ही तरतूद अपुरी आहे. वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्यांना खासगी रुग्णालयांमध्ये उपचार घेणे शक्य नसल्याने महापालिकेने नागरिकांना वाऱ्यावर सोडू नये, असे त्यांनी स्पष्ट केले.

शिक्षण क्षेत्राबाबत बोलताना त्यांनी प्राथमिक शिक्षणासाठीच्या निधीपैकी सुमारे ८० टक्के खर्च पगारावर होत असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी केवळ एक टक्का, म्हणजेच सुमारे १५० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून, ती अत्यंत अपुरी आहे. पुण्यासारख्या शहरात सावित्रीबाई फुले यांनी महिला शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले, याची आठवण करून देत त्यांनी शिक्षणाच्या पायाभूत सुविधांकडे दुर्लक्ष होत असल्याची टीका केली.

महापालिकेच्या २०७ आणि जिल्हा परिषदेच्या ६५ शाळा इमारतींसाठी केवळ दीड कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून, प्रत्येक शाळेला मिळणारा निधी अत्यल्प आहे. त्यामुळे इमारतींची दुरुस्ती, आवश्यक सुविधा आणि विद्यार्थ्यांसाठी दर्जेदार वातावरण निर्माण करणे कठीण ठरत असल्याचे त्यांनी सांगितले. अनावश्यक खर्च टाळून शिक्षण आणि आरोग्य या दोन मूलभूत क्षेत्रांसाठी अधिक निधीची तरतूद करावी, प्रत्येक विद्यार्थ्यावर योग्य खर्च व्हावा आणि नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा मिळाव्यात, यासाठी प्रशासनाने ठोस धोरण अवलंबावे, अशी मागणी धेंडे यांनी यावेळी केली.
————————-

प्रदीप लोखंडे, संपादक, राईट अँगल

संपर्क क्रमांक : 7350266967

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *