Stockholm Syndrome म्हणजे काय? । विषारी नात्यात अडकलेल्या मनाचा धक्कादायक मानसिक खेळ

कल्पना करा. तुम्ही एका खोलीत बंद आहात. बाहेर जायचा मार्ग नाही. तुमच्यासमोर उभा आहे तो माणूस ज्याने तुमचं अपहरण केलंय. सुरुवातीला भीती, घाबरटपणा, रडारड होईल. हे सगळं नैसर्गिकच. पण हळूहळू काहीतरी बदलायला लागतं. तोच अपहरणकर्ता तुम्हाला पाणी देतो, जेवण देतो, कधी हलकंसं बोलतो आणि तुमच्या मनात एक विचार येतो “अरे हा एवढा वाईट नाहीये कदाचित” इथून सुरू होतो एक विचित्र मानसिक खेळ. ज्याला म्हणतात (Stockholm Syndrome) “स्टॉकहोम सिंड्रोम”.

ही अशी अवस्था आहे जिथे पीडित व्यक्तीला आपल्या त्रास देणाऱ्याबद्दल सहानुभूती, ओढ किंवा कधी कधी प्रेमही वाटायला लागते. म्हणजे ज्याच्यापासून वाचायचं आहे, त्याच्याशीच भावनिक कनेक्शन तयार होतं! अजून धक्कादायक गोष्ट म्हणजे, कधी कधी ही व्यक्ती पोलिसांनाच किंवा स्वतःला वाचवायला आलेल्या लोकांनाच शत्रू मानायला लागते.

आता तुम्ही विचार करत असाल हे कसं शक्य आहे? तर उत्तर आहे मेंदूची सर्वायव्हल ट्रिक. जेव्हा एखादी व्यक्ती सतत भीतीखाली जगते तेव्हा तिचं मन स्वतःला वाचवण्यासाठी अपहरणकर्त्याच्या छोट्या छोट्या चांगल्या गोष्टींना मोठं करून पाहतं. म्हणजे तो ओरडला नाही, मारलं नाही, पाणी दिलं बस! त्याच्याबद्दल कृतज्ञता तयार होते. हळूहळू भीतीचं रूपांतर जुळवून घेण्यात होतं.

या सगळ्याची खरी सुरुवात झाली १९७३ मध्ये Stockholm या शहरात. एका बँकेत दरोडा पडला आणि काही कर्मचाऱ्यांना तब्बल सहा दिवस ओलीस ठेवण्यात आलं. पोलिस बाहेर होते. तणाव प्रचंड होता. पण जेव्हा हे लोक सुटले तेव्हा सगळ्यांनाच धक्का बसला. कारण त्यांनी दरोडेखोरांविरोधात साक्ष देण्यास नकार दिला. उलट त्यांच्या बचावासाठी पैसे गोळा केले! हे इतकं अनोखं होतं की स्वीडिश मानसशास्त्रज्ञ (Psychologist) Nils Bejerot यांनी या प्रकाराला नाव दिलं Stockholm Syndrome.

ही गोष्ट फक्त चित्रपटात किंवा अपहरणातच नाही घडत. ती आपल्या आजूबाजूलाही दिसते. काही लोक विषारी नात्यात अडकलेले असतात, सतत त्रास सहन करत असतात. पण तरीही त्या व्यक्तीचं समर्थन करतात. काही वेळा ऑफिसमध्ये शोषण होतं, तरी कर्मचारी बॉसचं तासनतास कौतुक करत राहतो. कारण मन हळूहळू त्या परिस्थितीशी जुळवून घेतं आणि त्यालाच नॉर्मल मानायला लागतं.

शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवा. कैद फक्त हातपायांची नसते. कधी कधी मनही कैद होतं. आणि सगळ्यात धोकादायक गोष्ट म्हणजे त्या कैदेत असतानाही माणसाला वाटतं. मी बरा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *