संकेत पाटील /तासगाव:
तासगाव शहराच्या पाणीटंचाईवर कायमस्वरूपी तोडगा निघाला आहे. माजी खासदार संजयकाका पाटील यांच्या पाठपुराव्याला यश येत धनगाव पाणी योजनेचे सर्व मोटर पंप, इलेक्ट्रिक पॅनेल्स व ट्रान्सफॉर्मर तासगाव नगरपालिकेकडे हस्तांतरित करण्यास शासनाने मंजुरी दिली आहे.
ठळक मुद्दे:
- कोट्यवधींचा फायदा: या निर्णयामुळे तासगाव पालिकेचे अंदाजे ७ ते ८ कोटी रुपये वाचणार आहेत. नव्याने यंत्रसामग्री खरेदी करावी लागणार नाही.
- वाढीव पाणीपुरवठा: हस्तांतरणामुळे शहराला वाढीव व सुरळीत पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. नागरिकांची पाण्यासाठीची ओढाताण थांबणार आहे.
- केवळ पाईपलाईन वगळली: काही तांत्रिक अडचणींमुळे योजनेची पाईपलाईन वगळता इतर सर्व यंत्रसामग्री पालिकेकडे हस्तांतरित होणार आहे.
- मंत्रीस्तरावर बैठक: या प्रश्नावर राज्याचे ग्रामीण पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत बैठक झाली. माजी खासदार संजयकाका पाटील व नगराध्यक्षा विजया बाबासाहेब पाटील यांनी मागणी लावून धरली होती.
- वरिष्ठ अधिकारी उपस्थित: बैठकीस महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव रंगानायक, मुख्य अभियंता वैशाली आवटे, सांगलीचे अधीक्षक अभियंता भांडेकर, मुख्याधिकारी सुधाकर लेंडवे व इतर अधिकारी उपस्थित होते.
“निवडणुकीत दिलेला शब्द संजयकाका पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण केला. या हस्तांतरणामुळे तांत्रिक अडथळे दूर होऊन शहराला वाढीव आणि शुद्ध पाणीपुरवठा वेळेवर मिळेल. तासगावकरांच्या हितासाठी आमचा पाठपुरावा सुरूच राहील.”
-प्रभाकर पाटील
या निर्णयाचे तासगाव शहरातून स्वागत होत आहे.
