महापालिका ६० कोटींच्या गैरव्यवहाराला लेखापाल प्रवीण जैनच जबाबदार ; चौकशी अहवालातील माहिती
पिंपरी । प्रदीप लोखंडे
पिंपरी चिंचवड महापालिकेतून बोगस उपसूचनाद्वारे ६० कोटींची बिले विविध विकासकामांसाठी अदा करत गैरव्यवहार झाल्याचे स्पष्ट झाले आहे. याला सर्वस्वी महापालिका लेखापाल प्रवीण जैन जबाबदार असल्याचे निश्चित करण्यात आले आहे. आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी महापौर रवी लांडगे यांना चौकशीचा अहवाल आज मंगळवारी (दि. १९) सुपूर्द केला. या मध्ये हे नमूद करण्यात आले खरे. मात्र आता जैन यांच्यावर कोणती कारवाई होणार या बाबत ठोस माहिती प्रशासन अथवा महापौर, स्थायी समिती सभापती यांनी दिली नाही.
आयुक्त सूर्यवंशी यांनी लेखापाल जैन यांच्यावर कारवाई करण्याचे अधिकार आपल्याला नसल्याचे सांगत राज्याच्या वित्त (अर्थ) विभागाला अहवाल पाठवल्याचे माध्यम प्रतिनिधींना सांगितले. पुढील कारवाई करण्याबाबत शासन निर्णय घेईल अशी त्यांनी माहिती दिली. हा अहवाल पाठविताना जैन यांची बदली करावी असे पत्र दिले असल्याचेही आयुक्त सूर्यवंशी यांनी सांगितले. तसेच ज्या कामासाठी बिले अदा केली आहेत त्या कामांची पडताळणी करून पुढील कार्यवाही नियोजित असल्याचे आयुक्तांनी सांगितले. तसेच उपसूचनेवर ज्या नगरसेवकांनी सही केली आहे. त्यांच्यावर कारवाई करण्याची जबाबदारी प्रशासनाची नसल्याचे आयुक्तांनी सांगितले. याउलट ज्या नगरसेवकांच्या बोगस सह्या आहेत. त्यांनी रीतसर पोलीस तक्रार करावी असे त्यांनी सुचविले.
दुसरीकडे महापौर रवी लांडगे आणि स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांनी पत्रकार परिषद घेत अहवालाची प्राथमिक माहिती दिली. त्यांनीही लेखापाल प्रवीण जैन यांनाच या गैरव्यवहाराला जबाबदार धरले आहे. नगरसेवकांना अंधारात ठेऊन सह्या घेतल्या. बिले अदा करताना नगरसेवकांच्या सह्या नाहीत. त्यामुळे नगरसेवकांना जबाबदार धरले जाणार नाही म्हणत क्लीन चीट देण्याचा प्रयत्न केला. तसेच जैन यांच्यावर काय कारवाई केली जाईल याबाबत स्पष्ट केले नाही.
एकंदरीतच प्रवीण जैन यांची बदली करून नाममात्र कारवाई दाखवली जाईल अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. प्रत्यक्ष ठोस कारवाई काय होणार याकडे शहराचे लक्ष लागले आहे.
ठेवींच्या मुदतीत अंतर ; कोट्यवधींचे व्याज बुडाले –
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या विविध बँकेत असलेल्या ठेवींची मुदत संपूनही काही दिवसांचे अंतर राखून नंतर ठेवी जमा करून तफावत करण्यात आली. त्यामुळे महापालिकेला कोट्यवधी रुपयांचे व्याज मिळाले नाही. या तफावतीला जैन जबाबदार असल्याचे अहवालात उघड झाले आहे. तसेच व्याजदर एकसारखाच असूनही खाजगी बँकेत ठेवी ठेवल्या. प्रत्यक्ष राष्ट्रीयीकृत बँकेत ठेवी न ठेवल्याने सुरक्षिततेबाबत प्रश्न चिन्ह उपस्थित केले आहेत.
—————
