छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी म्हणून ओळख असलेल्या किल्ले रायगड येथे स्वच्छतेच्या प्रश्नावरून संताप व्यक्त केला जात आहे. गडावर येणाऱ्या पर्यटकांकडून शौचालय वापरासाठी २५ रुपये शुल्क घेतले जात असतानाही अनेक ठिकाणी अस्वच्छता आणि अपुऱ्या सुविधांचा सामना करावा लागत असल्याची तक्रार समोर आली आहे.
याच पार्श्वभूमीवर एका महिला शिवप्रेमीने गडावरील कर्मचाऱ्यांना जाब विचारत तीव्र नाराजी व्यक्त केली. “२५ रुपये घेऊनही पर्यटकांना उघड्यावर शौचास जावे लागत असेल, तर ही बाब कितपत योग्य आहे?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

“शिवरायांच्या राजधानीचे पावित्र्य राखले जाते का? गडावर स्वच्छतेची अशी अवस्था का?” असे प्रश्न उपस्थित करत संबंधित व्यवस्थापनावरही त्यांनी टीका केली. गडावर येणाऱ्या हजारो पर्यटकांच्या दृष्टीने स्वच्छता आणि मूलभूत सुविधा अत्यावश्यक असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.
दरम्यान, या प्रकारामुळे पर्यटक आणि शिवप्रेमींमध्ये नाराजीचे वातावरण असून, गडावरील स्वच्छता व्यवस्थेकडे प्रशासनाने तातडीने लक्ष द्यावे, अशी मागणी होतेय.
