विलास लांडे, सुनील टिंगरे, योगेश बहल यांच्यासह अनेक इच्छुकांना डावलल्याची चर्चा; कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थतेचे वातावरण
राईट अँगल | प्रदीप लोखंडे
पुणे विधानपरिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून विक्रम काकडे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पक्षातील निष्ठावंत पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर उमटू लागला आहे. अनेक वर्षे पक्षासाठी काम करणाऱ्या नेत्यांना डावलून तुलनेने कमी सक्रिय असलेल्या आणि पक्षात आयात झालेल्या नेतृत्वाला संधी देण्यात आल्याची भावना कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाली आहे. त्यामुळे आगामी काळात पक्ष संघटनेवर आणि कार्यकर्त्यांच्या मनोबलावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
विक्रम काकडे हे भाजपचे माजी खासदार संजय काकडे यांचे पुत्र असून त्यांचे नाव उमेदवारीसाठी पुढे आल्यानंतर राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे. खासदार पार्थ पवार यांचे निकटवर्तीय म्हणून त्यांना पक्ष नेतृत्वाचा पाठिंबा मिळाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे. मात्र, या निर्णयामुळे अनेक जुन्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी निर्माण झाली असून पक्षासाठी सातत्याने काम करणाऱ्या नेत्यांच्या योगदानाकडे दुर्लक्ष झाल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
विधानपरिषद उमेदवारीच्या शर्यतीत पिंपरी-चिंचवडमधून माजी आमदार विलास लांडे, शहराध्यक्ष योगेश बहल आणि माजी नगरसेवक संदीप वाघेरे यांची नावे चर्चेत होती. तर पुणे शहरातून माजी आमदार सुनील टिंगरे यांचा दावा सर्वाधिक मजबूत मानला जात होता. अंतिम टप्प्यात विशेषतः विलास लांडे आणि सुनील टिंगरे यांच्या नावांवर पक्षात गंभीर चर्चा सुरू असल्याची माहिती मिळत होती. रविवारी, ३१ मे रोजी मध्यरात्रीपर्यंत विविध स्तरांवर खलबते सुरू होती. त्यामुळे उमेदवारी कोणाला मिळणार याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली होती.
३० मे रोजी पक्षाच्या कोअर कमिटीची बैठक पार पडली. मात्र या बैठकीला शहरातील अनेक प्रमुख पदाधिकाऱ्यांना निमंत्रित करण्यात आले नसल्याची चर्चा आहे. त्यामुळे स्थानिक नेतृत्वामध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले. उमेदवारी जाहीर करण्यापूर्वी किमान चर्चा किंवा सल्लामसलत होईल, अशी अपेक्षा अनेकांनी व्यक्त केली होती. परंतु अंतिम निर्णय घेताना स्थानिक नेतृत्वाला विश्वासात घेण्यात आले नसल्याचे बोलले जात आहे.
सुनील टिंगरे यांचे नाव उमेदवारीसाठी आघाडीवर मानले जात होते. पक्षाच्या पडत्या काळात त्यांनी संघटना मजबूत करण्यासाठी प्रयत्न केले. शहरात राष्ट्रवादीची ताकद वाढविण्यासाठी त्यांनी सातत्याने काम केले. विधानपरिषदेची जागा राष्ट्रवादीकडे यावी यासाठी देखील त्यांनी विविध पातळ्यांवर प्रयत्न केल्याचे त्यांच्या समर्थकांचे म्हणणे आहे. त्यामुळे त्यांचा दावा अधिक भक्कम असल्याची भावना कार्यकर्त्यांमध्ये होती.
दुसरीकडे, विलास लांडे यांचे नाव देखील चर्चेत होते. पिंपरी-चिंचवडमध्ये त्यांचा जनसंपर्क आणि राजकीय अनुभव लक्षात घेता त्यांना संधी मिळू शकते, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र अंतिम क्षणी चित्र बदलले आणि विक्रम काकडे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले.
दरम्यान, पक्षात तुलनेने कमी सक्रिय असलेल्या विक्रम काकडे यांना उमेदवारी का देण्यात आली, याबाबत विविध तर्कवितर्क लढवले जात आहेत. या निर्णयामुळे निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये चुकीचा संदेश जाऊ शकतो, अशी चर्चा पक्षांतर्गत सुरू आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय राष्ट्रवादीसाठी किती फायदेशीर ठरतो, याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. कार्यकर्त्यांची नाराजी दूर करण्यात पक्ष नेतृत्वाला यश येते की नाही, हे येणाऱ्या काळात स्पष्ट होणार आहे.
