बोरगावात साडेसात हजार वृक्षांची लागवड
संकेत पाटील /तासगाव
तासगाव तालुक्यातील बोरगाव येथील आयुष्यमान आरोग्य मंदिर परिसरात आरोग्य विभाग व कृषी विभागाच्या संयुक्त विद्यमाने ‘हरित महाराष्ट्र अभियान’ अंतर्गत ‘अटल आनंदवन’ वृक्षलागवड मोहीम उत्साहात पार पडली. या मोहिमेत तब्बल साडेसात हजार वृक्षांची लागवड करण्यात आली.
यावेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष ऋषिकेश लाड, जिल्हा परिषद सदस्य अक्षय पाटील, अर्जुन पाटील, पंचायत समिती सभापती अरुणा पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विजयकुमार वाघ, पंचायत समिती सदस्या कमल पाटील, सदस्य सुनील जाधव, तालुका कृषी अधिकारी अनिल फोंडे, वैद्यकीय अधिकारी डॉ. पराग सोनवणे, माजी सभापती संभाजी पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
बोरगाव आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रात वंजारवाडी, ढवळी, शिरगाव, बोरगाव, लिंब, चिखलगोठण, पानमळेवाडी, निंबळक व आळते या नऊ गावांचा समावेश आहे. आरोग्य केंद्राच्या माध्यमातून विविध आरोग्यविषयक उपक्रम राबविले जात असून, गर्भाशयाच्या मुखाच्या कॅन्सरपासून प्रतिबंधासाठीच्या लसीकरणातही बोरगाव आरोग्य केंद्राने उल्लेखनीय काम केले आहे. १४ ते १५ वयोगटातील १७६ मुलींपैकी ११६ मुलींचे लसीकरण करण्यात आले आहे.

आरोग्य केंद्राच्या विकासासाठी ग्रामस्थांनी लोकवर्गणीच्या माध्यमातून विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. तसेच वृक्षलागवडीसाठीही लोकसहभागातून काम करण्यात आले. या उपक्रमासाठी मदत करणाऱ्या व्यक्ती व मंडळींचा यावेळी उपाध्यक्ष ऋषिकेश लाड यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
ऋषिकेश लाड म्हणाले, “प्रत्येक विकासकामात लोकसहभाग महत्त्वाचा आहे. लोकसहभागाशिवाय कोणतेही काम गतिमान होऊ शकत नाही. बोरगाव आरोग्य केंद्राचे काम कौतुकास्पद असून, पुढील काळात केंद्राला आवश्यक ती सर्व मदत करण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू.”
माजी सभापती संभाजी पाटील यांनी बोरगाव आरोग्य केंद्राच्या कामाचे कौतुक केले. आरोग्य केंद्र उभारणीसाठी सहकार्य करणाऱ्या ग्रामस्थांसह अधिकारी, कर्मचारी आणि आरोग्य विभागातील सर्वांचे त्यांनी आभार मानले.
यावेळी आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी व सर्व कर्मचारी, सरपंच, ग्रामस्थ तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
