१५० अर्ज दाखल ; कोअर कमिटीच्या बैठकीत नावांवर चर्चा; प्रदेश पातळीवर अंतिम शिक्कामोर्तब
पिंपरी । प्रदीप लोखंडे
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्वीकृत सदस्यपदासाठी भारतीय जनता पक्षात मोठी चुरस निर्माण झाली असून इच्छुकांकडून तब्बल १५० अर्ज दाखल झाले आहे. शहरातील विविध राजकीय, सामाजिक आणि संघटनात्मक क्षेत्रात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी या पदासाठी दावेदारी केली आहे. त्यामुळे पक्षात इच्छुकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून अंतिम निवड करताना पक्ष नेतृत्वासमोर मोठे आव्हान उभे राहणार आहे.
स्वीकृत सदस्यपदासाठी आलेल्या अर्जांवर चर्चा करण्यासाठी लवकरच शहर भाजपाची कोअर कमिटी बैठक होणार आहे. या बैठकीत अर्जदारांच्या नावांवर सविस्तर चर्चा केली जाईल. त्यानंतर काही नावांची निश्चिती करून ती नावे प्रदेश पातळीवर पाठवण्यात येणार आहेत. अंतिम निर्णय मात्र प्रदेश नेतृत्वाकडून घेण्यात येणार असल्याचे पक्ष सूत्रांनी सांगितले.
या प्रक्रियेत शहरातील चारही आमदारांची भूमिका महत्त्वाची मानली जात आहे. आमदार महेश लांडगे, आमदार शंकर जगताप, उमा खापरे आणि अमित गोरखे यांच्या शिफारशींनाही मोठे महत्त्व असणार आहे. प्रत्येक आमदाराच्या गटातील कार्यकर्त्यांची संख्या आणि त्यांच्या मागे असलेला पाठिंबा याचाही विचार होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे कोणत्या गटाचे किती समर्थक स्वीकृत सदस्यपदासाठी पुढे येतात, याकडेही पक्षातील नेत्यांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, मागील महापालिका निवडणुकीत उमेदवारी मिळालेल्या आणि निवडणूक लढवलेल्या काही मातब्बर नेत्यांचा या प्रक्रियेत विचार होणार नसल्याची माहिती भाजपाच्या सूत्रांकडून देण्यात येत आहे. त्यामुळे काही माजी नगरसेवकांची संधी कमी झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. याउलट अनेक इच्छुकांनी पक्षातील वरिष्ठ नेत्यांच्या भेटीगाठी वाढवल्या असून आपली दावेदारी मजबूत करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. काही जण तर पक्षाच्या प्रमुख नेत्यांच्या दारात उंबरे झिजवत असल्याचेही चित्र दिसत आहे. सामाजिक काम, संघटनात्मक योगदान आणि पक्षनिष्ठा या निकषांवर उमेदवारांची छाननी केली जाणार असल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, शहर भाजपाच्या कोअर कमिटीच्या बैठकीनंतर निवड झालेली नावे प्रदेश नेतृत्वाकडे पाठवली जातील. त्यानंतर प्रदेश पातळीवर अंतिम निर्णय घेऊन स्वीकृत सदस्यांची अधिकृत घोषणा केली जाणार आहे. पुढील महापालिका सर्व साधारण सभेच्या बैठकीपर्यंत ही नावे जाहीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
————————-
बातमीसाठी संपर्क : 7350266967

प्रतिक्रिया व्यक्त करा