पक्ष बळकटीकरणासाठी शिवसेना सरसावली

पक्ष बळकटीकरणासाठी शिवसेना सरसावली
  • शहर प्रमुख बदलासह नवीन कार्यकारिणीची होणार पुनर्रचना

पिंपरी ! प्रदीप लोखंडे

पिंपरी-चिंचवड शहरात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने पुन्हा एकदा संघटन मजबूत करण्यासाठी पाऊले टाकली असून पदाधिकाऱ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण करण्यासाठी विविध हालचाली सुरू केल्या आहेत. महापालिका निवडणुकीतील अपयशानंतर पक्षाला मोठा धक्का बसला होता. या पार्श्वभूमीवर शहरातील नेतृत्व बदल आणि नव्या कार्यकारिणीची उभारणी करण्यासाठी वरिष्ठ स्तरावरून चाचपणी सुरू झाली आहे.

पक्षाच्या सूत्रांच्या माहितीनुसार, नुकतीच संपर्क प्रमुख सचिन अहिर यांच्या उपस्थितीत एक महत्त्वाची आढावा बैठक पार पडली. या बैठकीत शहरातील संघटनात्मक परिस्थिती, कार्यकर्त्यांचा प्रतिसाद आणि आगामी रणनीती यावर सविस्तर चर्चा झाली. यावेळी पदाधिकाऱ्यांकडून विविध सूचना आणि मते मांडण्यात आली. पक्षाची ताकद पुन्हा उभी करण्यासाठी स्थानिक स्तरावर ठोस निर्णय घेण्याची गरज असल्याचे मत या बैठकीत व्यक्त करण्यात आले.

पिंपरी-चिंचवड महापालिकेत पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या विचारांचे एकेकाळी नऊ नगरसेवकांचे प्रतिनिधित्व असलेल्या शिवसेनेला यंदाच्या निवडणुकीत एकही जागा मिळाली नाही. हा पराभव पक्षासाठी मोठा धक्का मानला जात आहे. निवडणुकीच्या काळात अनेक महत्त्वाचे नेते आणि नगरसेवकांनी पक्षाची साथ सोडल्याने संघटना कमकुवत झाली. मावळ लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार राहिलेले आणि माजी महापौर संजोग वाघेरे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला, तर काहींनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. यामुळे पक्षात नेतृत्वाची मोठी पोकळी निर्माण झाली आहे. ही पोकळी भरून काढण्यासाठी आणि पक्षाला पुन्हा एकदा सक्षम करण्यासाठी आता वरिष्ठांनी ठोस पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.

लवकरच खासदार संजय राऊत यांच्या उपस्थितीत आणखी एक महत्त्वपूर्ण बैठक होणार असल्याची माहिती मिळत आहे. या बैठकीत शहर प्रमुखपदासाठी संभाव्य नावांवर चर्चा होणार असून नव्या कार्यकारिणीच्या स्थापनेची प्रक्रिया गतीमान केली जाणार आहे. शहर प्रमुख कोण होणार, याबाबत अद्याप स्पष्टता नसली तरी पक्षात आणि इतर पक्षांतून येण्यास इच्छुक असलेल्या नेत्यांमधून एखाद्या सक्षम चेहऱ्याची निवड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच पक्षातील जुन्या निष्ठावान कार्यकर्त्यांनाही संधी देण्याचा विचार सुरू आहे. त्यामुळे आगामी काळात शिवसेनेच्या संघटनात्मक रचनेत मोठे बदल पाहायला मिळू शकतात.

एकूणच, पिंपरी-चिंचवडमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने नव्याने उभारी घेण्याचा निर्धार केला असून आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संघटन अधिक मजबूत करण्यासाठी वेगाने पावले उचलली जात आहेत. या बदलांमुळे शहरातील राजकीय समीकरणांमध्येही बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

————————————

प्रदीप लोखंडे, संपादक, राईट अँगल
संपर्क क्रमांक : 7350266967

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *