विधानपरिषद निवडणूक : राष्ट्रवादी पुण्याच्या जागेवर ठाम !

विधानपरिषद निवडणूक : राष्ट्रवादी पुण्याच्या जागेवर ठाम !
  • रायगडसह परभणीच्या जागेवर दावा ; आज दिल्लीत होणार अंतिम निर्णय

पिंपरी । प्रदीप लोखंडे

राज्यातील विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीमध्ये जागावाटपाची जोरदार चर्चा सुरू असून राष्ट्रवादी काँग्रेसने पुणे मतदारसंघावरील आपला दावा ठाम केला आहे. पुण्यासह रायगड आणि परभणी या जागांवरही राष्ट्रवादीने दावा सांगितल्याने महायुतीतील जागा वाटपाचा तिढा अधिकच वाढल्याचे चित्र निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर आज बुधवारी (दि. २७) दिल्लीत महत्त्वाची बैठक होणार असून त्यामध्ये अंतिम निर्णय होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत आज दिल्लीत बैठक होणार आहे. या बैठकीत विधानपरिषद निवडणुकीसाठी महायुतीतील जागा वाटपाचा अंतिम फॉर्म्युला निश्चित केला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. सध्या भाजपला १२ जागा, शिवसेनेला चार जागा आणि राष्ट्रवादी काँग्रेसला एक जागा असा प्राथमिक फॉर्म्युला चर्चेत असल्याचे बोलले जात आहे. मात्र हा प्रस्ताव शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला अमान्य असल्याची माहिती समोर येत आहे.

शिवसेनेने आपल्या विद्यमान राजकीय ताकदीच्या आधारावर अधिक जागांची मागणी केली असून राष्ट्रवादी काँग्रेसने देखील पुण्याच्या जागेवर ठाम भूमिका घेतली आहे. या शिवाय रायगड आणि परभणी या मतदारसंघांवर देखील राष्ट्रवादीने दावा केल्याने चर्चेला अधिक रंग चढला आहे. दरम्यान, परभणीची जागा शिवसेनेच्या वाट्याला जाण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला दोन जागा मिळाल्यास पुणे आणि रायगड या जागांवर समाधान मानावे लागू शकते, असा अंदाज राजकीय निरीक्षकांकडून व्यक्त केला जात आहे.

पुणे मतदारसंघात अनेक इच्छुक उमेदवार सक्रिय झाले असून पक्षश्रेष्ठींच्या निर्णयाकडे त्यांचे लक्ष लागले आहे. महायुतीतील जागावाटपाचा निर्णय लांबल्याने इच्छुकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र दिल्लीत होणाऱ्या बैठकीनंतर चित्र स्पष्ट होण्याची शक्यता असून त्यानंतर उमेदवारांच्या नावांची अधिकृत घोषणा होऊ शकते. विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय हालचालींना वेग आला असून महायुतीतील जागावाटपाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


बातमीसाठी संपर्क : ७३५०२६६९६७

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *