बापावर चौफेर शाब्दिक वार, लेक आदिती चा पलटवार

सुनील तटकरे यांच्यावर होणाऱ्या आरोपांना मंत्री आदिती तटकरे यांचा करारा जवाब

रायगडच्या पालकमंत्री पदावर मंत्री आदिती तटकरे यांचे भाष्य

रायगड : धम्मशील सावंत


अजित पवार यांच्या निधनानंतर विरोधी पक्षांतील नेत्यांकडून प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांना लक्ष केले जात आहे. याबाबत आदिती तटकरे यांना विचारणा केली असता त्यांनी टीकाकारांना सडेतोड उत्तर दिले आहे.अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ताब्यात घेण्याचा प्रयत्न प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी केल्याचा आरोप केला जात आहे. रोहीत पवार यांच्याकडून सातत्याने तटकरे यांना लक्ष केले जात आहे.

समाजमाध्यमांवर यासदर्भात मोठ्या प्रमाणावर टीका होत आहे. या टीकेला राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी पहिल्यांदाच उत्तर दिले आहे. कोणी कितीही टिका टिप्पणी केली तरी तटकरे कुटूंब आणि अजितदादांच्या कुटूंबाच्या संबधात वितुष्ट येणार नाही. आम्ही यापुढील काळातही पवार कुटूंबाच्या पाठिशी ठामपणे उभे राहणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.तटकरे कुटूंबाचे आणि पवार यांच्या कुटूंबाचे जिव्हाळ्याचे संबंध राहीले आहेत. पवार कुटूंबातील प्रत्येकाशी सुरवातीच्या काळापासून आमचे चांगले संबध राहीले आहेत. सुरवातीपासून अतिशय समन्वयाने त्यांच्या पक्षातील कार्यकर्ते म्हणून आम्ही काम करत आलो आहोत. गेल्या ३० ते ३५ वर्षांपासून अजितदादांचे जवळचे सहकारी म्हणून तटकरे साहेब काम करत आले आहेत. दोघांची घनिष्ठ मैत्री होती. यापूढेही ती कायम राहील. कोणाला पटो अथवा न पटो आम्ही आदरणीय सुनेत्राकाकीं सोबत यापुढील काळा कायम राहणार आहोत. त्यांना पाठबळ देण्याच्या दृष्टीकोनातून जे काही करणे शक्य आहे ते आम्ही करत राहणार आहोत असेही तटकरे यांनी स्पष्ट केले आहे. त्या रोहा येथे माध्यमांशी बोलत होत्या.

आयटी क्षेत्रामध्ये हिंदू धर्माच्या मुली सुरक्षित नाहीत या प्रश्नावर मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या की या प्रकरणाची माझ्याकडे सविस्तर माहिती आलेली नाही, परंतु जर काहीं लोकप्रतिनिधी यांनी हा मुद्दा घेतला असेल तर मला खात्री आहे नाशिकचे पोलिस प्रशासन याच्यावर यासंदर्भात त्यांनी गांभीर्याने दखल घेतली असेल, महिला व बालविकास विभागाची मंत्री म्हणून आयटी क्षेत्रातील महिलांसोबत काही चुकीचा प्रकार घडला असेल तर तिथल्या स्थानिक प्रशासनासोबत संपर्क करून आणखी कडक कारवाई करण्याच्या सूचना देण्यात येतील. असे मंत्री तटकरे माध्यमांशी संवाद साधताना म्हणाल्या.
अशोक खरात प्रकरणातील पीडित महिलांचे व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहेत या वर आदिती तटकरे यांनी परखड भुमिका मांडली. त्या म्हणाल्या आपल्या मीडियाच्या माध्यमातून सर्व नागरिकांना आवाहन असेल तर अशा पद्धतीच्या व्हिडिओ व्हायरल करण्याला कुणी प्रोत्साहन देऊ नये, आपल्याकडे जर अशा व्हिडिओ आल्या तर त्याबद्दलची रीतसर तक्रार स्थानिक पोलिसांनी द्यावी,आणि आपल्याकडून दुसऱ्या कोणाला फॉरवर्ड होणार नाहीत याची दक्षता सर्व नागरिकांनी घ्यावी. मी सुरवाती पासून च या भूमिकेवर ठाम राहिली, की मूळ मुद्दा हा त्या पीडित महिला ज्यांच्यावर खऱ्या अर्थाने अतिशय निंदनीय प्रकार झालेला आहे. ज्या पीडितांवर अन्याय झाला त्यांना न्याय मिळण्यासाठी शासन सर्वच पद्धतीने प्रयत्न करीत आहे, एक महिला अधिकारी त्याची प्रमुख म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नेमलेली आहे, या व्यतिरिक्त जर आणखी पीडित महिलांना त्यासंदर्भात माहिती द्यायची असेल त्यांनी पुढे यावे त्यांची ओळख राखून ठेवण्याच्या दृष्टीने पोलिस प्रशासन खबरदारी घेईल, कुठले साईट, कुठले प्लॅटफॉर्म ज्यावरून हे व्हिडिओ व्हायरल केले जातात त्यांच्यावर सुद्धा पोलिस विभागाच्या वत्तीने कडक कारवाई करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून दिलेले आहेत. असे तटकरे म्हणाल्या.

पालकमंत्री पदाबाबत काय म्हणाल्या आदिती तटकरे….

विधानसभा निवडणुकीनंतर महायुतीची सत्ता स्थापन होऊन दीड वर्ष होत आले तरी रायगड जिल्ह्याचा पालकमंत्री पदाचा तिढा सुटू शकलेला नाही. शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस दोन्ही पक्ष रायगडच्या पालकमंत्री पदासाठी आग्रही असल्याने, गेली दीड वर्ष जिल्ह्याचे पालकमंत्रीपद रिक्त ठेवण्यात आले आहे. पालकमंत्री पदाबाबत महायुतीत एकमत होत नसल्याने, या संदर्भातील निर्णय होऊ शकलेला नाही., या पार्श्वभूमीवर माध्यमांशी संवाद साधतांना आदिती तटकरे यांनी महत्वाचे विधान केले आहे. रायगडच्या पालकमंत्रीपदाचा निर्णय लवकरच घेतला जाईल, मख्यमंत्री आणि दोन्ही मुख्यमंत्री या संदर्भातील निर्णय योग्यवेळी घेतील. तोवर निधीच्या बाबतीत रायगड जिल्ह्यावर कुठलाही अन्याय होणार नाही याची दक्षता वेळोवेळी घेतली जात आहे. महायुतीचे सर्व नेते यासाठी प्रयत्नशील आहेत असेही त्या म्हणाल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *