गॅस सिलेंडरच्या (Lpg Gas cylendar) तुटवड्याने ग्रामीण भागातील लोकांनी पुन्हा चुली पेटवायला सुरवात केली आहे. या निमित्ताने ग्रामीण भागातील चुलीच्या आठवणी जाग्या करणारा हा विशेष लेख नक्की वाचा.
कोपऱ्यापासून एक-दीड फूट अंतर राखून घरात मातीची चूल (chulah) होती. कोपऱ्यात सोडलेल्या एक दीड फुटाच्या जागेत जळण ठेवलेलं असायचं. दिवेलागण होण्याअगोदर आई परड्यातील जळणाच्या ढिगातून जळण मोडून चुलीच्या कोपऱ्यात ठेवायची. भांडी, कपडे धुणे, झाडू मारणे या कामांसारखच जळण मोडणे हे महत्वाचं काम असायचं. आठवड्यातून एकदा आई पाटीत भिजवलेल्या पांढऱ्या मातीत पोत्यारा बुडवून चुलीला पोत्यारा द्यायची. पोत्यारा दिल्यावर चुलीच्या एका कोपऱ्यात हळदी कुंकवाचा टिळा लावायची. चुलीच्या पाया पडायची. जिच्यावर आपलं अन्न तयार होतं त्या चुलीला देव मानण्याची प्रथा अनेक पिढ्यांपासून चालत आली होती.

जुन्या चुलीच्या एका कोपऱ्यात गाडग्यांची उतरंड होती. त्यामध्ये मीठ तसेच इतर धान्य डाळी भरून ठेवलेल्या असायच्या. उतरंडीतील गाडग्यांवर चुन्याने नक्षी काढलेली असायची. चुलीवर एक उभी वीट लावून तिला सारवलेलं होतं. तिच्यावर दिवा ठेवलेला असायचा. दिवेलागणीच्या अगोदर दिव्यात रॉकेल भरून तयार असायचं. शेजारणीच्या घरात बसलेल्या आयाबाया दिवस मावळला की दिवेलागणीच्या वेळ झाली म्हणून आपापल्या घरात यायच्या. पूर्वीचे दिवे वैशिष्टयपूर्ण होते. गावात. नंतरच्या काळात संत्राच्या मोकळ्या क्वाटरमध्ये रॉकेल भरून त्यात साडीच्या धडीची वात टाकून दिवा तयार केला जाऊ लागला. कंदील केवळ थोड्या श्रीमंत असणाऱ्या कुटुंबात होता.
सुरवातीला एका वैलाची चूल होती. पुन्हा दोन वैलाची चूल आली. हळूहळू वैलांची संख्या वाढू लागली. वैल वाढले तरीही केवळ ठराविक वैलांनाच समान जाळ पोहचत असायचा. नंतरच्या काळात निर्धूर नावाची केवळ नावालाच निर्धूर असणारी चूल आली. अर्थातच पहिल्यांदा ती देखील सुरवातीला श्रीमंतांच्याच घरात. निर्धूर चूल घेण्याचं कित्येक बायांचं स्वप्न असायचं. हे स्वप्न त्या आपल्या पतीला बोलून दाखवायच्या. आता बाईक, कार खरेदी केल्यावर जसा आनंद होतो तसा पूर्वी निर्धूर चूल घरात आणल्यावर होत होता. ही चूल थोडी आकाराने मोठी होती. तिच्या एका वैलातून मोठी पाईप वर काढलेली असायची. कवलाला भोक पाडून ती घरावर सोडलेली असायची. त्यातून चुलीतील धूर काही प्रमाणात बाहेर फेकला जायचा.

एक भाकरी परातीत एक चुलीवर आणि एक चुलीच्या तोंडात शेकण्यासाठी लावलेली असायची. भाकरीचा प्रवास परातीतून ताटात आणि मग पोटात असा व्हायचा. शेकून ताटात आलेल्या कडक भाकरीचा पापुन्द्रा काढायचा तिच्यावर तेल चटणी लावून गुंडाळून फिरून खाण्याचा आस्वाद मी अनेकदा घेतलाय.
पहाटे उठलं की राख केर काढण्याचं काम पहिलं असायचं. चुलीतील राख उकीरंड्यात टाकली जायची. तिथून ती शेतात जायची.
स्वयंपाक बनवताना चुलीतील जाळ सलग तेवत ठेवणे हे विशेष कसब होतं. जाळ कमी झाला की नळीने एका सुरात फुंकर मारून जाळ करावा लागायचा. कुठल्या पदार्थांसाठी कुठल्या झाडाचे जळण चांगले हा अनुभव जुनी जाणती माणसं सांगायची. चुलीच्या बाबतीत काही गमतीशीर श्रद्धा अस्तित्वात होत्या. चुलीतील जाळ फरफर करायला लागल्यावर कुणीतरी पाहुणा येतो असा समज होता. भाकरी बनवून झाल्यावर कधी कधी तव्याच्या खालील केंद्रबिंदूपासून फुलत मोठे होत जाणारे वर्तुळ पाहून तवा हसत आहे असे म्हटले जात असायचे. चुलीला पाय लावू दिला जात नव्हता. ग्रामीण भागातील घरातून आज चूल हद्दपार झाली आहे. पण या आठवणी मात्र आजही तशाच आहेत…
