भोसरीतील यशवंतनगरमध्ये ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर रिक्षा स्टँड’चे उत्साहात उद्घाटन
पिंपरी ! प्रतिनिधी
भोसरी येथील यशवंतनगर चौकात ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर रिक्षा स्टँड’चे उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडले. या प्रसंगी महाराष्ट्र रिक्षा पंचायतीचे संस्थापक अध्यक्ष व कष्टकऱ्यांचे नेते डॉ. बाबा कांबळे यांनी शहरातील सर्व रिक्षा स्टँड हे ‘आदर्श समाजसेवा केंद्र’ बनावेत, असे आवाहन केले.
यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. बाबा कांबळे म्हणाले की, पिंपरी-चिंचवड हे कष्टकरी, कामगार आणि मध्यमवर्गीयांचे शहर असून शहराच्या दळणवळणामध्ये रिक्षा हे अत्यंत महत्त्वाचे साधन आहे. रिक्षा चालकांनी केवळ प्रवास सेवा न देता नागरिकांशी सौजन्यपूर्ण वर्तन ठेवून आपल्या रिक्षा स्टँडला समाजसेवेचे केंद्र बनवावे, असे त्यांनी सांगितले.
महाराष्ट्र रिक्षा पंचायतीच्या स्थापनेला २० वर्षे पूर्ण होत असल्याचा उल्लेख करत त्यांनी सांगितले की, २००६ पासून संघटनेने रिक्षा चालकांच्या हितासाठी अनेक लढे दिले. रिक्षा चालकांसाठी कल्याणकारी महामंडळ स्थापन करण्यात यश मिळाले असून ‘मुक्त रिक्षा परवाना’ धोरणाविरोधात दिलेल्या लढ्यामुळे राज्यात हे धोरण बंद करण्यात आले, ही चालकांसाठी मोठी दिलासादायक बाब ठरली आहे.
आज महाराष्ट्र रिक्षा पंचायत ही राज्यातील सर्वात मोठ्या संघटनांपैकी एक बनली असून पुणे, मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, बीडसह ८ जिल्ह्यांत कार्यालये आणि सर्व ३६ जिल्ह्यांत पदाधिकारी सक्रिय आहेत. रिक्षा चालकांचे प्रश्न प्रामाणिकपणे मांडल्यामुळेच संघटनेचा विस्तार झाला असल्याचे त्यांनी नमूद केले.
या कार्यक्रमास विभागाध्यक्ष गणेश लोखंडे, उपाध्यक्ष नदीम शेख, स्टँड अध्यक्ष अंकुश भाऊ काळे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी उपाध्यक्ष शाम वाघमारे, खजिनदार लखन मस्के, सचिव विशाल लगाडे तसेच कार्यकारी सदस्य विशाल वाघमारे, विकी सोनकांबळे, आशपाक शेख, संभाजी शेंडगे, मनोज शिंदे, अविनाश गवळी, ऋषिकेश कांबळे आणि आतिश बनसोडे यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाला परिसरातील रिक्षा चालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
