मनसेची मागणी; कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा
संकेत पाटील /तासगाव
तासगाव : आमदार रोहित पाटील यांच्या पुढाकारानंतर तासगाव कृषी उत्पन्न बाजार समितीने बेदाणा सौद्यावेळी बेदाणा उधळू नये, सौद्यात घेतलेला बेदाणा पुन्हा बॉक्समध्ये ठेवावा, तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यापाऱ्याला सौद्यातून बाहेर काढण्यात येईल, असे स्पष्ट निर्देश दिले होते. मात्र, सोमवार, दि. २४ ऑगस्ट रोजी झालेल्या बेदाणा सौद्यात व्यापारी विनीत बाफना यांनी बेदाणा उधळल्याचा आरोप करत मनसे जिल्हा संघटक अमोल काळे यांनी बाजार समिती प्रशासनाकडे धडक देत परवाना रद्द करण्याची मागणी केली आहे.
बेदाणा उधळणीच्या प्रश्नावरून बेदाणा उधळणी बंद करण्याच्या मागणीसाठी अमोल काळे यांनी आमरण उपोषण केले होते. उपोषण स्थगित करताना बाजार समितीचे सभापती, सचिव व संचालक मंडळाच्या वतीने बेदाणा उधळण होणार नाही, अशा आशयाचे पत्र देण्यात आले होते.
त्यानंतर बाजार समितीने सौद्यावेळी व्यापाऱ्यांना नियमांचे पालन करण्याच्या सूचना दिल्या. सौदा सुरू असताना घेतलेला बेदाणा पुन्हा बॉक्समध्ये न टाकता उधळताना कोणी आढळल्यास त्याला सौद्यातून बाहेर काढण्यात येईल, असेही स्पष्ट करण्यात आले होते. मात्र, सोमवारच्या सौद्यात विनीत बाफना यांनी बेदाणा उधळल्याचा आरोप करत काळे यांनी बाजार समितीच्या नियमांचीच पायमल्ली झाल्याचे म्हटले आहे.
बाजार समितीने घेतलेला निर्णय आणि आमदार रोहित पाटील यांनी केलेल्या प्रयत्नांनंतरही नियमांचे उल्लंघन होत असेल, तर संबंधितांवर कठोर कारवाई झाली पाहिजे. शेतकऱ्यांच्या मालाची उधळण करून त्यांचे आर्थिक नुकसान करणाऱ्या व्यापाऱ्याला पाठीशी घालू नये, अशी मागणी काळे यांनी केली.
चौकट :
बाफनाचा परवाना रद्द करा :
विनीत बाफना यांचा बाजार समितीचा परवाना तातडीने रद्द करावा आणि त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी अमोल काळे त्यांनी निवेदनाद्वारे केली आहे. पुढील चार ते पाच दिवसांत ठोस कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही काळे यांनी दिला आहे.

