आपला देश झपाट्याने विकसित होत आहे. विकासाच्या झगमगाटाचा आपल्याला अभिमानच वाटतो. पण आपल्या समोर उभा असलेला हा विकासाचा झगमगाटी डोलारा गावगाड्यातील हजारो कारागिरांच्या चितेवर उभा आहे. पण त्याच्या बौद्धिक संपत्तीचा आर्थिक मोबदला तर सोडाच पण त्यांच्याविषयी साधी कृतज्ञता व्यक्त न करण्याचा करंटेपणा आपण केला आहे. ग्रामीण बलुतेदार वर्गाचे गावगाड्यातील महत्वपूर्ण योगदान आणि त्यांच्या संक्रमणाचा विषण्ण करणारा काळ डोळ्यासमोर आणणारा सागर गोतपागर यांचा विशेष लेख नक्की वाचा…

पेरणीच्या दिवसात सुतार शिवारातून दिवसभर फिरत होता. पेरणी सुरु असताना एखाद्या शेतकऱ्याची कुरी, कुळव मोडला तर त्याला मदत करता यावी; हा त्यामागील उद्देश होता. आपण बनवून दिलेली अवजारे नीट चालतात का? हे तो शिवारभर फिरून पाहत असे. सुतार आपल्या बांधावर आला की शेतकरी आनंदी होत होता. पेरणी करणाऱ्या शेतकऱ्याच्या वट्यातील एका दाण्यापासून पसाभर दाणे तयार होणार असतात. म्हणून तो आपल्या वट्यातील भुईमुगाचे दाणे मुलालाही देत नाही. पण बांधावर आलेल्या सुताराच्या वट्यात तो धान्याची ओंजळ रिकामी करायचा. ग्रामीण भागात बलुतेदार जातींमध्ये असा जिव्हाळा होता. यंत्र विकसित नसल्याच्या काळात गावगाड्यातील अत्यावश्यक गरजा अलुतेदार, बलुतेदार वर्गाकडून भागवल्या जात होत्या. या व्यवसायावर त्यांचा उदरनिर्वाह अवलंबून होता. बलुतेदारी हा केवळ धंदा नव्हता तर ती एक महत्वपूर्ण सेवा होती. या सेवेबाबत त्यांना वस्तू स्वरूपात मोबदला मिळत होता. गाव गाड्यातील शेती तसेच दैनंदिन आयुष्याशी संबंधित इतर गरजा भागवणारा बलुतेदार वर्ग हा प्रमुख घटक होता. या वर्गाशिवाय शेतीचे चक्र पूर्ण होत नव्हते. शेतकरी आणि बलुतेदार वर्गाचे जिव्हाळ्याचे संबंध होते.

कारागिरांशिवाय कला सादर करून लोकांचे मनोरंजन करणारा भटक्या विमुक्त जातींचा दुसरा समूह होता. साहसी कसरतीचे खेळ करून डोंबारी समाज लोकांची करमणूक करत होता. वेगवेगळी सोंगे घेऊन बहुरूपी लोकांचे मनोरंजन करत होता. भोपे आराधी अंबाबाईची स्तुती कवने गात गावोगावी फिरत होता. त्या बदल्यात त्याला धान्य मिळायचं. वासुदेव, डवरी गोसावी, कडकलक्ष्मी, बहुरूपी, पिंगळा, मदारी, गोंधळी, नंदीवाला हे सुगीच्या दिवसात आपापल्या कला सादर करून पोट भरत होते. या सर्वांची मिळून एक संस्कृती ग्रामीण भागात उदयास आली होती. हेळवी समाज सर्व पिढ्यांच्या जन्माच्या नोंदी ठेवत होता. हे समूह इमाने इतबारे आपली सेवा देत होते. कधी पायी तर कधी गायीवरून, बैलगाडीतून गावोगाव भटकंती करत होते. घिसाडी समाज गावागावात जाऊन लोखंडी हत्यारे बनवून देत होता. कोळशाच्या भट्टीवर लालबुंद तापवलेल्या लोखंडाला खुरपी, कुऱ्हाड, कोयत्याचा आकार देत होता. या कामातील पिढीजात निपुणता त्याच्याकडे होती. ओबड धोबड दगडावर सुतकीने घाव घालून वडार त्याला जाते, पाटा वरवंट्याचा आकार देत होता. त्याने बनवलेल्या जात्यातून पीठ तयार होत होतं. त्याने बनवलेल्या याच जात्यावरून ओव्यांची समृद्ध साहित्य परंपरा अस्तित्वात आली. अन्न शिजवण्यासाठी चूल बनवण्याचे कसब कुंभार समाजाकडे होते. मातीची भांडी तसेच सण समारंभात लागणाऱ्या इतर मातीच्या वस्तू हा वर्ग बनवत होता. बुरुड, कैकाडी समाज बांबूपासून वेगवेगळ्या वस्तू विणण्याचे काम करत होता. सणगर घोंगडी विणण्यात निपुण होता. घोंगडीसाठी लागणारी लोकर तसेच खाण्यासाठी मांसाचे उत्पादन करण्याची जबाबदारी धनगर समाज पार पाडत होता. धनगर समाजाची गजी नृत्य, धनगरी ओव्यांची सांस्कृतिक परंपरा तयार झाली आहे. हार बनवण्याचे काम माळी समाज करत होता. केस कापणे दाढी करण्याचे कसब नाभिक समाजाकडे होते. त्या कामात तो पारंगत होता. ढोर, मांग या जाती कातडे कमावत होत्या. चांभार त्यापासून चपला बनवत होता. दोरी विणणे, झाडू बनवणे, गावातील धार्मिक कार्यक्रमात हलगी वाजवण्याचे काम मांग समाज करत होता. होलार समाज कातडी कमावण्याच्या कामासोबतच वाद्य वाजविण्यात पारंगत होता.
त्या काळात सांगावा पाठवण्याचे काम महार जातीतील तराळाकडे असायचं. घुंगरू बांधलेली काठी घेऊन तराळ गावासाठी सांगावा पाठवण्याचे काम करत होता. हा सांगावा बहुतांशवेळा मेलेल्या व्यक्तीबाबतच असायचा. एखाद्या सासूरवाशिणीच्या दारात तराळ येऊन उभा राहिला की ती हंबरडा फोडायची. माहेरचे कुणीतरी गेले आहे हे तिला समजायचे. तराळाचे तोंड पाहणे अशुभ मानले जायचे. सांगावा सांगणारा तराळ आपल्याला दिसूच नये अशी प्रार्थना केली जायची. सांगावा पोहचवण्यासाठी तराळ चालत जात असे. गावात आलेल्या सरकारी अधिकाऱ्यांचा निरोप पोहचविण्याची जबाबदारी त्याच्यावर होती. स्वातंत्र्य पूर्व काळात रामोशी समाजाकडे संरक्षणाचे काम होते. तो ते काम इमाने इतबारे करत होता.

गावगाड्यात कामातून एक सांस्कृतिक गुंफण तयार झाली होती. एकमेकांशिवाय जगणे कठीण होत होते. प्राथमिक गरजांसाठी एकमेकांवर अवलंबून राहावे लागत होते. गावगाड्याची संस्कृती अशाप्रकारे समृद्ध होती. गावगाड्यातील मातीला पहिल्या पावसात सुगंध येत होताच पण याच मातीत दलित समूहाला अस्पृश्य ठरवणारी माणुसकीला काळिमा फासणारी अस्पृश्यतेची प्रथा देखील अस्तित्वात होती. या प्रथेने त्यांचा माणूस म्हणून असलेला अधिकार देखील नाकारला होता.
यंत्रयुगाचा जसजसा विकास होत गेला तसतशी जातीनुसार कामाची गावगाड्यातील वीण सैल होत गेली. हस्तकलेतून निर्माण होणाऱ्या वस्तूंची जागा यंत्राने घेतली. भांडवली युगात या कारागिरांच्या वस्तूंची मागणी कमी होऊ लागली. उदा: मिक्सर आल्यामुळे वरवंटा पाट्याची मागणी कमी झाली. लाकडांऐवजी लोखंडाची अवजारे आल्याने सुतारावर बेकार होण्याची वेळ आली. मातीच्या भांड्यांचा वापर बंद झाला. चुलीची जागा गॅस शेगडीने घेतली. त्यामुळे कुंभाराचे उत्पादन घटले. कुंभाराचे पारंपरिक काम बंद झाले. प्लास्टिकमुळे बुरुड समाजाने बांबूपासून बनवलेल्या वस्तूंची मागणी घटली. माध्यम क्षेत्रात झालेल्या बदलामुळे मनोरंजनाची जुनी साधने मागे पडली. टिव्ही सोशल मीडियामुळे गावात येऊन आपली कला सादर करणारा डोंबारी बहुरूपी बेकार झाला. गावगाड्यातील पीक पद्धतीत मोठे फेरबदल झाले. त्यामुळे सुगीचा हंगाम नष्ट झाला. धान्याची पिके बंद झाल्याने धान्य विकत घेण्याची वेळ शेतकऱ्यावर आली. त्यामुळे गावात येणारा वासुदेव, नंदीबैलवाला, पिंगळा जोशी यांची झोळी रिकामी राहू लागली. वर्षानुवर्षे भटकंती करणाऱ्या या वर्गावर उपासमारीची वेळ आली. हा समाज शहरात स्थलांतरित झाला. एखाद्या पुलाखाली, गटाराकडेला राहायचं सिग्नलवर मागायचं, रस्त्याकडेला डोंबाऱ्याचा खेळ मांडायचा मिळेल ते गोळा करून त्यावर आपला उदरनिर्वाह पार पाडायचा अशी दयनीय अवस्था या समूहाची झाली आहे.

बदलत्या भांडवली युगाबरोबर ज्या कारागिरांनी आपल्या व्यवसायात बदल स्वीकारला ते टिकून आहेत. पण जातीनुसार कामाचे जातिसंस्थेचे वैशिष्ट्य भांडवली व्यवस्थेने मोडीत काढले. याला स्वच्छतेची कामे करणाऱ्या काही दलित जाती अपवाद आहेत. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या संघर्षानंतर पूर्वाश्रमीच्या महार समुदायाचा पुनर्जन्म झाला. तो शहरात स्थिर स्थावर झाला. प्रबुद्ध वाटेवर चालू लागला.
भांडवली युगात निर्माण झालेल्या आधुनिक यंत्रांचा, व्यवसायांचा पाया रचण्याचे महत्वपूर्ण काम बलुतेदार आलुतेदार जातींनी केले. पण याच जातींच्या बौद्धिक संपदेवर उभ्या राहिलेल्या यंत्र युगात या जाती मात्र देशोधडीला लागल्या आहेत. आज केशकर्तनाचे काम अन्य कोणीही करू शकते. हा व्यवसाय आधुनिक झाला. तो ग्लोरिफाय झाला. पूर्वी तुटपुंज्या पैशात, धान्य स्वरूपात मिळणाऱ्या बैत्यात हे कारागीर हे काम करायचे. आता या व्यवसायातील नफा वाढला पण या व्यवसायातून हा समाज हद्दपार होऊ लागला. पूर्वी सामाजिक विषमता सोसूनही त्यांनी ही सेवा केली. आता आधुनिक युगात मात्र या क्षेत्रातील स्पर्धा वाढली. पण जातीने हे काम करणारा वर्ग तसाच राहिला. यातील काहींनी आपल्या व्यवसायाचे आधुनिकीकरण केले. पण पारंपरिक व्यवसाय अडचणीत आला आहे.
मातंगाने बनवलेल्या नैसर्गिक दोरखंडाला गावगाड्यात मोठी मागणी होती. हे दोरखंड नैसर्गिक साधनांपासून बनवले जात असल्याने पर्यावरण पूरक होते. त्याचे विघटन होत होते. पण आधुनिक काळात कंपन्यांमध्ये तयार होणाऱ्या नायलॉनच्या दोरखंडापुढे हा पारंपरिक दोरखंड टिकाव धरू शकला नाही. पारंपरिक दोरखंडाचा उत्पादन खर्च जास्त आहे. त्यामुळे त्याची किंमत जास्त आहे. त्या तुलनेत नायलॉन दोरी कमी किंमतीत मिळते. त्यामुळे ग्राहक त्याच्याकडे फिरकत नाहीत. हीच अवस्था आता झाडूची झाली आहे. झाडू व्यवसाय धोक्यात आला आहे. बुरुड समाजाने विणलेल्या टोपल्या तसेच इतर साहित्यांऐवजी प्लॅस्टिकच्या टोपल्या बाजारात आल्या. त्या तुलनेने या स्वस्त टिकाऊ आहेत. ग्राहक त्या घेणे जास्त पसंत करतो. पण प्लॅस्टिकमुळे प्रदूषण निर्माण करणारा कचरा तयार होतो. नव्या भांडवली युगात पर्यावरणाचा फारसा विचार केला जात नाही. पूर्वीचे उद्योग पर्यावरण पूरक होते. चर्मकार समाजाने आपल्या हस्तकलेतून आकर्षक चमड्याच्या चपला बनवल्या. त्याच चपलांची कॉपी मोठमोठ्या कंपन्यांनी केली. जुन्या कारागिरांना ना याचे पेटंट मिळालं ना त्याच्या संशोधनाचे श्रेय. नव्या काळात मिळणारा सर्व नफा मात्र या कंपन्यांनी ओरबाडला. महाराष्ट्रात आलेल्या गोवंश हत्याबंदी कायद्याचे प्रतिकूल परिणाम चामडे उद्योगावर झाले आहेत. येथील उद्योजकांना चामडे दुसऱ्या राज्यातून आयात करावे लागते. त्यामुळे उत्पादन खर्च वाढतो. त्यामुळे या व्यवसायाला देखील आता घरघर लागली आहे.
एकेकाळी गावगाड्यातील समृद्धीचे प्रतीक असणारे हे जात समूह आता स्वतःचे अस्तित्वच हरवून बसले आहेत. ग्रामीण कारागीर वर्गाच्या चितेवर विकासाचा डोलारा उभा आहे. पण त्या वर्गाप्रती कृतज्ञता देखील न दाखवण्याचा करंटेपणा आपण केला आहे….

प्रतिक्रिया व्यक्त करा