१, २, ५ रुपयांच्या नाण्यांसह १०-२० च्या नोटांचा तुटवडा; सकाळची सुरुवातच ‘चिल्लर शोध’ मोहिमेने
*संकेत पाटील /तासगाव
तासगाव शहरात सध्या चिल्लरचा तीव्र तुटवडा निर्माण झाला असून, किरकोळ व्यवहार करणाऱ्या दुकानदारांसाठी ही मोठी डोकेदुखी ठरली आहे. एक, दोन आणि पाच रुपयांच्या नाण्यांसह १० व २० रुपयांच्या नोटांची कमतरता इतकी वाढली आहे की, दररोज सकाळी दुकान उघडताच सर्वप्रथम “चिल्लर कुठून आणायची?” हा प्रश्न दुकानदारांसमोर उभा ठाकतो.
दुकानदारांना दररोज त्यांच्या कामगारांना पानपट्टी किंवा पाणी एटीएमजवळील विक्रेत्यांकडे चिल्लर मिळवण्यासाठी पाठवावे लागते. मात्र, तिथेही चिल्लर मिळेल याची खात्री नसते. परिणामी, दिवसभर ग्राहक आणि दुकानदारांमध्ये चिल्लरवरून वादाचे प्रसंग घडत आहेत.
या बाबत आम्ही काही स्थानिक दुकानदारांशी संवाद साधला असता,
श्री गणेश बझार चे मालक शेखर पवार सांगतात –
“सकाळी दुकान उघडल्यावर पहिलं काम म्हणजे चिल्लर जमवणं. बँकेत गेलं तरी चिल्लर मिळत नाही. ग्राहक ५०० ची नोट देतो, पण परत देण्यासाठी आमच्याकडे काहीच नसतं.”
चहा विक्रेते धनराज खरे यांची कथा काही वेगळी नाही,ते सांगतात
“चहा १० रुपयांचा आहे, पण ग्राहक २०० किंवा ५०० ची नोट देतो. चिल्लर नसल्यामुळे अनेक वेळा ग्राहक परत जातात. त्यामुळे थेट व्यवसायावर परिणाम होतो.”
बेकरी व्यावसायिक दीप गुप्ता सांगतात,
“खाजगी बँकांमध्ये चिल्लर मागितलं तर ‘नाही’ असंच उत्तर मिळतं. सरकारी बँकांमध्येही रांगा लांब असतात. रोजचा हा प्रश्न सोडवण्यासाठी ठोस उपाययोजना गरजेची आहे.”
तासगावातील चहा गाड्या, किराणा दुकाने, हॉटेल्स आणि बेकरी व्यवसायिकांना या समस्येचा सर्वाधिक फटका बसत आहे. डिजिटल पेमेंटचा वापर वाढत असला तरी सर्वच ग्राहक त्याचा वापर करत नाहीत, त्यामुळे चिल्लरची गरज कायम आहे.
दरम्यान, प्रशासन आणि बँकांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन चिल्लर पुरवठा सुरळीत करण्याची मागणी व्यापाऱ्यांकडून होत आहे. अन्यथा, “चिल्लर” हा छोटा वाटणारा प्रश्न पुढे मोठ्या आर्थिक अडचणीत रूपांतरित होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
