सांगलीच्या या गावातील हिंदू मंदिरात केला जातो मलिद्याचा नैवेद्य

महाराष्ट्रात हिंदू मुस्लीम, मराठा ओबीसी द्वेष वाढतोय. या प्रतिकूल काळात महाराष्ट्रात असे एक हिंदू मंदिर आहे. ज्या मंदिरात हिंदू मुस्लीम, मराठा ओबीसी एकत्र आल्याशिवाय नित्यपुजाच पार पडत नाही. कुठे आहे हे मंदिर? काय आहे येथील हिंदू मुस्लीम ऐक्याची अभिमानास्पद परंपरा वाचा राईट अँगलचा विशेष रिपोर्ट .

सांगलीच्या या गावातील हिंदू मंदिरात केला जातो मलिद्याचा नैवेद्य

“देवाची सेवा करणाऱ्या बारा सेवेकऱ्यांना भेटलं की आपल्याला देव भेटला अशी भक्तांची श्रद्धा आहे. म्हणून खरसुंडीला आलं की पहिल्यांदा ते या सेवेकऱ्यांना भेटतात. बारा बलुतेदार असलेल्या सेवेकऱ्यांना भेटल्यावर साक्षात देवाला भेटल्याचे समाधान भक्तांना मिळतं”.
सांगलीच्या खरसुंडी येथील श्री सिद्धनाथ देवस्थानातील नाथपंथी डवरी समाजाचे मानकरी संभाजी इंगवले यांनी मंदिरातील परंपरेबाबत ही माहिती दिली. बारा बलुतेदारांमध्येच देव पाहण्याची परंपरा सांगलीच्या श्री क्षेत्र खरसुंडी गावाने आजपर्यंत जपली आहे. श्री सिद्धनाथ हे महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्रप्रदेशातील भाविकांचे श्रद्धास्थान आहे. खरसुंडीतील बारा बलुतेदार वर्गाला या मंदिरात विशेष स्थान आहे. या परंपरेला इसवी सन पूर्व नवव्या शतकांपासूनचा इतिहास आहे. या इतिहासाबाबत पुढे बोलताना ते सांगतात, “देवाच्या सेवेसाठी बहुजन समाजातील बारा बलुतेदारांना तयार केलं. यामध्ये गुरव समाजाची पुजारी म्हणून नेमणूक केली. नाथपंथी डवरी गोसावी समाजाला देवाचे पतारी पूजन व गोंधळ घालण्याची जबाबदारी मिळाली. भालदार चोपदाराची जबाबदारी मराठा समाजाकडे आली. देवाच्या अंघोळीसाठी गरम पाणी देण्याची जबाबदारी शिताळी समाजाकडे आली. देवाची आरती म्हणणे, ढोल वाजवणे, देवाची गाणी म्हणणे आणि मंदिर परिसरात स्वच्छता ठेवण्याची जबाबदारी घडशी समाजाकडे आली. देवाच्या मनोरंजनासाठी गाणी नृत्य करणारी नायकीण नेमण्यात आल्या. देवाचा मुख्य गाभारा स्वच्छ करणे, पूजेच्या वस्तू व दागिने स्वच्छ करणे, नंदादीपसाठी वाती पुरवणे, आरतीच्यावेळी घंटा गजर करणे आणि नैवेद्यासाठी पत्री पुरवणे ही जबाबदारी बसवी समाजाकडे आली. देवाच्या स्नानासाठी पाणी गरम करावे लागते. त्यासाठी सरपणाच्या मोळ्या आणण्याची जबाबदारी मोळक्या समाजाला मिळाली. वर्षानुवर्षे देवाची सेवा करण्याचे काम हे सेवेकरी करत आहेत”.

मंदिरात वर्षातील काही विशेष दिवसांना भक्त गर्दी करतात. यामध्ये १२ पौर्णिमा, २ यात्रा, ४८ ते ५० रविवार, दसरा उत्सव, सासनकाठी उत्सवाचा समावेश होतो. या काळात दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांकडून मिळणाऱ्या दानावर सेवेकऱ्यांचा उदरनिर्वाह चालतो. भक्त त्यांना सढळ हस्ते त्यांना दान करतात.
श्री सिद्धनाथ मंदिरातील सासनकाठीचा विशेष मान मुस्लीम बांधवांना आहे. हिंदू मुस्लीम ऐक्याचे प्रतिक म्हणूनही या देवस्थानाकडे पाहिले जाते. या अभिमानास्पद परंपरेबाबत श्री नाथदेव देव देवस्थानचे ट्रस्टचे अध्यक्ष चंद्रकांत पुजारी सांगतात, “ दशमीच्या दिवशी हिंदू आणि मुस्लीम दोघे मिळून सासनकाठ्या घोडे खुरला नेतात. तेथे स्नान घालून दुसऱ्या दिवशी परत आणतात. पालखी जोगेश्वरी मंदिरात गेल्यानंतर दोन्ही सासनकाठ्या हिंदू-मुस्लीम मिळून मुख्य मंदिरात आणतात. या गावात अनेक वर्षांपासून हिंदू मुस्लीम ऐक्याची परंपरा टिकून आहे. हिंदूंच्या उत्सवात मुस्लीम सहभागी होतात तर मुस्लिमांच्या उत्सवात हिंदू सहभागी होतात”.
मोहरमला खरसुंडी गावात मुस्लीम बांधव रंगीबेरंगी ताबूत सजवतात. या मुस्लीम उत्सवातील एक महत्वपूर्ण गोष्ट योगेश पुजारी यांनी सांगितली, “ मुस्लीम समाज जे रंगीबेरंगी ताबूत बनवतो त्यासाठी श्री सिद्धनाथ मंदिरातील रंगीबेरंगी पागोटे दिले जाते. उत्सव संपल्यावर हे पागोटे पुन्हा मंदिरात आणले जाते. ही परंपरा फार पूर्वीपासून चालत आली आहे”.

या मंदिरातील आणखी एक विशेष बाब राईट अँगल टीमच्या निदर्शनास आली. प्रत्येक शनिवारी देवाला मलिद्याचा नैवेद्य दाखवला जातो. हिंदू मंदिरात मलिद्याचा नैवेद्य कसा? असा प्रश्न आम्हाला पडला. त्याच्या उत्तराच्या शोधात आम्ही परिसरात चौकशी केली असता आम्हाला येथे अभ्यासक असलेले बाळासाहेब निचळ भेटले. त्यांनी यामागची एक आख्यायिका सांगितली. “अफजल खान ज्यावेळी प्रतापगडावर चालून आला त्यावेळी त्याने पळशी जवळील बानुरगड येथे तळ ठोकला होता. त्या परिसरात त्याचा अत्याचार सुरु होता. अफजल खानाच्या सरदाराने खरसुंडीच्या सिद्धनाथ मंदिरावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मंदिराच्या रक्षणाची मालोजीराजे यांच्याकडे दिलेली होती. या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला त्यांची समाधी आजही या मंदिर परिसरात आहे. अफजलखानाच्या सैन्याने आत प्रवेश केला. पण त्यांना समोर लिंगाऐवजी तूर्भत दिसू लागली. ते बाहेर आले की त्यांना लिंग दिसायचे पण आत प्रवेश केला की तुर्भत दिसायची. ही बाब त्यांनी अफजलखानास सांगितली. त्याने एक विश्वासू साथीदाराला तेथे पाठवले. त्यालाही तोच साक्षात्कार झाला. त्याने ही बाब अफजल खानास सांगितली. त्यानंतर अफजल खानाने मंदिरातील बन गादीवरील प्रमुख महाराजांना बोलावून घेतले. त्यांना बानुरगडची ९० एकर जमीन इनाम म्हणून दिली. त्या बदल्यात त्यांना दर शनिवारी मंदिरात चपातीचा मलिद्याचा नैवेद्य दाखवण्याचे काम दिले. तेंव्हापासून या मंदिरात दर शनिवारी मलिद्याचा नैवेद्य दाखवण्याची परंपरा सुरु झाली”.
श्री सिद्धनाथाच्या सासनकाठी उत्सवात हिंदू-मुस्लीम, मराठा ओबीसी एकत्र येतात. सजवलेल्या भगव्या सासनकाठ्या वाऱ्यावर दिमाखात फडकतात. जात, धर्म विसरून एकत्रित आलेला लाखोंचा जनसमुदाय, भक्तीत तल्लीन होऊन गुलाल खोबऱ्याची मुक्त उधळण करतो. वेगवेगळ्या रंगाचे कपडे घालून आलेला समूह एकाच गुलाबी रंगात न्हाऊन निघतो. हा रंग केवळ गुलालाचा नाही. तर महाराष्ट्राच्या मातीत, एकरूप झालेल्या वेगवेगळ्या संस्कृत्यांच्या मिलाफाचा आहे…..

#kharsundi siddhanath mandir, #obc, bara balutedar pratha, kharsundi siddhanath yatra, maharashtra rural culture, rural culture, sangli kharsundi, shree siddhanath mandir khrsundi

Team right angle news

Similar Posts

View All
सोलापूरच्या मोहोळ तालुक्यातील शेटफळ गावात मंदिर प्रवेशाच्या मुद्द्यावरून सुरू झालेला तणाव दलित वस्तीवरील हल्ल्यापर्यंत पोहोचला. २०० ते ३०० जणांच्या जमावाने हल्ला केल्याचा आरोप असून १० जण जखमी झाले. नेमकं काय घडलं? वाचा हा ग्राउंड रिपोर्ट.

सोलापूरच्या मोहोळ तालुक्यातील शेटफळ गावात मंदिर प्रवेशाच्या मुद्द्यावरून सुरू झालेला तणाव दलित वस्तीवरील हल्ल्यापर्यंत पोहोचला. २०० ते ३०० जणांच्या जमावाने हल्ला केल्याचा आरोप असून १० जण जखमी झाले. नेमकं काय घडलं? वाचा हा ग्राउंड रिपोर्ट.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत