- राष्ट्रवादीतून पुणे की पिंपरीला संधी ? आज किंवा उद्या उमेदवारीवर निर्णय
पिंपरी : प्रदीप लोखंडे
राज्यातील विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उमेदवारीसाठी मोठी उत्सुकता निर्माण झाली असून पुणे आणि पिंपरी-चिंचवडच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला पुणे मतदारसंघ मिळणार की अन्य कोणत्या मतदारसंघावर पक्षाची उमेदवारी निश्चित होणार, याबाबत अद्याप स्पष्टता नसली तरी संभाव्य उमेदवारांनी लॉबिंगला वेग दिला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसला पुणे मतदारसंघ मिळाल्यास उमेदवारी पुणे शहराला मिळणार की पिंपरी-चिंचवडला प्रतिनिधित्व दिले जाणार, याकडे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचे लक्ष लागले आहे. पक्षातील अनेक इच्छुक आपल्या परीने वरिष्ठांकडे संपर्क वाढवत असून राजकीय समीकरणे जुळविण्याचा प्रयत्न करत आहेत.
यामध्ये माजी आमदार विलास लांडे यांच्या नावाची सर्वाधिक चर्चा रंगत आहे. पिंपरी-चिंचवड परिसरात त्यांचा मोठा जनसंपर्क असून दोन वेळा आमदार म्हणून त्यांनी काम केले आहे. जिल्ह्यातील विविध भागांमध्ये त्यांचे राजकीय आणि सामाजिक संबंध मजबूत मानले जातात. त्यामुळे पक्षाकडून अनुभवी चेहऱ्याला संधी देण्याचा विचार झाल्यास लांडे यांच्या नावाला प्राधान्य मिळू शकते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
दुसरीकडे पुण्यातून माजी आमदार सुनील टिंगरे हे देखील विधानपरिषदेच्या उमेदवारीसाठी इच्छुक असल्याचे समोर येत आहे. पुणे शहरात त्यांचा संपर्क आणि पक्षातील सक्रियता लक्षात घेता त्यांचे नावही चर्चेत आहे. मात्र पक्षाने पिंपरी-चिंचवडला प्रतिनिधित्व देण्याचा निर्णय घेतल्यास त्यांच्या अपेक्षांवर पाणी फिरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, पक्षातील युवा नेतृत्व आणि विशेषतः पार्थ पवार यांची भूमिका या संपूर्ण प्रक्रियेत महत्त्वाची मानली जात आहे. अंतिम उमेदवारी निश्चित करताना स्थानिक राजकीय समीकरणे, आगामी निवडणुकांची तयारी आणि सामाजिक प्रतिनिधित्व यांचा विचार केला जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
आज मंगळवारी किंवा उद्या बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारीबाबत अंतिम निर्णय जाहीर होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील कार्यकर्त्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली असून कोणाच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
————————-
बातमीसाठी संपर्क : 7350266967
