नागपुरातील शिष्यवृत्ती वितरण कार्यक्रमात नागालँडचे अतिरिक्त पोलिस महासंचालक संदीप तामगाडगे यांनी आपण सिकलसेलचे वाहक असल्याचे जाहीरपणे सांगितले.
सिकलसेलवरील मौन तोडण्याचे आवाहन करत त्यांनी लग्नापूर्वी रक्ततपासणी आणि योग्य वैद्यकीय समुपदेशनाची गरज अधोरेखित केली.
कार्यक्रमात सिकलसेलग्रस्त विद्यार्थ्यांना ‘अथर्व शैक्षणिक शिष्यवृत्ती’ देण्यात आली.
तुकाराम मुंढे यांनीही विद्यार्थ्यांना मोबाईलचा सुज्ञ वापर आणि माहितीची पडताळणी करण्याचा सल्ला दिला.
‘सिकलसेलवरचं मौन आधी तोडा’; वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्याने जाहीर केली स्वतःची वाहक स्थिती
नागपुरात शिष्यवृत्ती वितरण कार्यक्रमात लग्नापूर्वी रक्ततपासणीचे आवाहन; सिकलसेलग्रस्त विद्यार्थ्यांना ‘अथर्व शिष्यवृत्ती’

नागपूर, ता. ३ : ‘‘मी स्वतः सिकलसेलचा वाहक आहे. मी वरिष्ठ अधिकारी आहे, सामान्य आयुष्य जगतो; पण हे जाहीरपणे सांगायला मला कोणताही संकोच वाटत नाही,’’ असे सांगत नागालँडचे अतिरिक्त पोलिस महासंचालक संदीप तामगाडगे (भा.पो.से.) यांनी रविवारी येथे जाहीर व्यासपीठावरून स्वतःची सिकलसेल वाहक स्थिती स्पष्ट केली आणि लग्नापूर्वीची रक्ततपासणी हा सामाजिक जागृतीचा भाग बनला पाहिजे, असे आवाहन केले.
स्मृतिशेष मधुकरराव तामगाडगे चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने सिव्हिल लाइन्स येथील डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात शैक्षणिक शिष्यवृत्ती वितरण, सिकलसेल जनजागृती व करिअर मार्गदर्शन कार्यक्रम झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तामगाडगे होते. ज्येष्ठ भारतीय महसूल सेवेतील अधिकारी उन्मेष वाघ यांच्या हस्ते उद्घाटन झाले, तर राज्याचे अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे (भा.प्र.से.) यांचे प्रमुख भाषण झाले.
यावेळी धनंजय वंजारी (भा.म.से.), रिझर्व्ह बँकेच्या नागपूर विभागाचे प्रादेशिक संचालक सचिन शेंडे, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पाली व बौद्ध अध्ययन विभागाचे प्रमुख डॉ. नीरज बोधी, ट्रस्टच्या अध्यक्षा कुसुमताई तामगाडगे, उपाध्यक्षा लीना तामगाडगे आणि सिकल सेल सोसायटी ऑफ इंडियाच्या अध्यक्षा जयश्री रामटेके उपस्थित होत्या.
आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील गुणवंत मुलींना शिष्यवृत्ती देण्यात आली. तसेच सिकलसेलग्रस्त विद्यार्थ्यांना ‘अथर्व शैक्षणिक शिष्यवृत्ती’ प्रदान करण्यात आली. वारंवार उद्भवणाऱ्या आजारपणामुळे या विद्यार्थ्यांचे शिक्षण थांबू नये, या हेतूने ही शिष्यवृत्ती सुरू करण्यात आली आहे.
‘लग्न ठरवताना रक्तच तपासले जात नाही’
तामगाडगे म्हणाले, ‘‘सिकलसेलविषयी उघडपणे बोलल्याशिवाय त्याचे गांभीर्य लोकांपर्यंत पोहोचणार नाही. लग्न ठरवताना कुटुंब अनेक बाबींचा विचार करते; मात्र रक्ततपासणीकडे दुर्लक्ष होते. लग्नापूर्वीची तपासणी, योग्य वैद्यकीय समुपदेशन आणि माहितीच्या आधारावर घेतलेला निर्णय हा जनजागृतीचा भाग झाला पाहिजे.’’ तपासणीसोबत संवेदनशील समुपदेशन आणि अचूक माहिती असावी, भीती किंवा भेदभाव नको, असेही त्यांनी स्पष्ट केले.
‘‘सिकलसेल हा केवळ एका व्यक्तीचा वैद्यकीय प्रश्न किंवा एका कुटुंबाची जबाबदारी नाही. हा सामाजिक प्रश्न आहे. यात शासन, आरोग्य संस्था, स्वयंसेवी संस्था आणि समाज या सर्वांचा सहभाग आवश्यक आहे,’’ असे ते म्हणाले. निदान सुविधा, नियमित उपचार आणि रक्तसंक्रमणाची सोय पोहोचलेली नाही अशा भागांत हा ताण अधिक असतो, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
नागालँडमधील अनुभव सांगताना ते म्हणाले, ‘‘तेथे एखादे मूल निराधार झाले, तर संपूर्ण समाज त्याच्या शिक्षण, रोजगार आणि पुनर्वसनाची जबाबदारी उचलतो. कोणताही सामाजिक प्रश्न एकट्या व्यक्तीने सुटत नाही आणि प्रत्येक जबाबदारी शासनावर टाकताही येत नाही.’’ ‘सिकलसेलमुक्त भारत’ हे उद्दिष्ट केवळ शासकीय योजनांतून किंवा एका संस्थेच्या कामातून साध्य होणार नाही, असेही ते म्हणाले.
शिष्यवृत्तीची रक्कम थेट खात्यावर वर्ग करता आली असती; मात्र अशा जाहीर कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांना अनुभवी व्यक्तींशी संवाद साधता येतो आणि सामाजिक प्रश्नांची जाणीव होते, असे त्यांनी कार्यक्रमामागील भूमिका स्पष्ट करताना सांगितले.
सुरक्षित रक्तपुरवठ्याचा प्रश्न
जयश्री रामटेके यांनी नियमित रक्तसंक्रमणावर अवलंबून असलेल्या रुग्णांच्या अडचणी मांडल्या. रुग्णांना सुरक्षित व दर्जेदार रक्त मिळाले पाहिजे आणि सर्व रक्तपेढ्या व उपचार केंद्रांमध्ये दर्जाचे निकष सारखेच पाळले गेले पाहिजेत, यावर त्यांनी भर दिला.
तामगाडगे यांनी स्वर्गीय पद्मश्री संपत रामटेके यांच्या कार्याचे स्मरण केले. तुकाराम मुंढे यांनी आरोग्य व दिव्यांग कल्याण क्षेत्रात केलेल्या कामाचाही त्यांनी उल्लेख केला. सिकलसेल व थॅलेसेमियाग्रस्तांच्या अडचणी त्यांच्यासमोर मांडल्यानंतर त्यांनी संबंधित कायदे व यंत्रणांचा अभ्यास करून मदतीचे मार्ग शोधले; त्यामुळे बाह्यतः न दिसणाऱ्या दिव्यांगत्वाकडे प्रशासनाचे लक्ष वेधले गेले, असे ते म्हणाले. उन्मेष वाघ यांनी संस्थात्मक व सीएसआर मदतीतून तपासणी मोहिमांना दिलेल्या पाठबळाबद्दलही त्यांनी आभार मानले.

‘मोबाईल आपण वापरतो की मोबाईल आपल्याला?’
तुकाराम मुंढे म्हणाले, ‘‘ज्ञान आता प्रत्येकाच्या खिशात मोबाईलच्या रूपाने आहे. खरे आव्हान त्या ज्ञानाचे शहाणपणात रूपांतर करण्याचे आहे. प्रश्न मोबाईल वापरावा की नाही हा नाही; प्रश्न असा आहे की आपण मोबाईल वापरतो की मोबाईल आपल्याला वापरतो.’’
डिजिटल माध्यमावर दिसते म्हणून कोणतीही माहिती स्वीकारू नका, तिचा स्रोत, अचूकता, हेतू व परिणाम तपासा, असे त्यांनी सांगितले. ‘‘कृत्रिम बुद्धिमत्ता, मशिन लर्निंग आणि समाजमाध्यमे जरूर वापरा; पण प्रश्न विचारण्याची व पडताळण्याची सवय लावा,’’ असे ते म्हणाले. ‘‘आवाजाचा गोंगाट झाला की विचार दबतो. विचार करणे ही समस्या नाही, विचारशून्यता ही खरी समस्या आहे,’’ असा इशाराही त्यांनी दिला.
स्पर्धा परीक्षेपलीकडेही संधी
उन्मेष वाघ यांनी स्पर्धा परीक्षेतील अपयश म्हणजे व्यावसायिक आयुष्याचा शेवट नव्हे, असे सांगत लॉजिस्टिक्स, बंदरे, रेल्वे, विमान वाहतूक व पुरवठा साखळी व्यवस्थापन या क्षेत्रांतील संधींकडे लक्ष वेधले. ‘‘अभ्यासासोबत खरी मैत्री जोडा. अडचणीच्या काळात साथ देणारे मित्र हेच मोठे बळ ठरतात,’’ असे ते म्हणाले.
धनंजय वंजारी यांनी बाह्य दबावाऐवजी स्वतःची क्षमता व आवड पाहून करिअर निवडावे, असे सांगितले. सचिन शेंडे यांनी बँकिंग, वित्त, तंत्रज्ञान व स्टार्टअप क्षेत्रांतील संधी सांगत विद्यार्थ्यांनी नोकरी मागणारे नव्हे, तर रोजगार निर्माण करणारे व्हावे, असे आवाहन केले. डॉ. नीरज बोधी यांनी व्यापक वाचनाचा आग्रह धरत संशोधन, भाषा, पाली व बौद्ध अध्ययन क्षेत्रांतील संधी सांगितल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सिद्धार्थ गायकवाड यांनी केले, तर स्वप्नील निखाडे यांनी आभार मानले.
