वेदना असतानाही ती पायी चालत राहिली… आणि दिला बाळाला जन्म
संकेत पाटील / तासगाव
आदिवासी समाजातील गरोदर माता घरीच प्रसूती करतात, अशी रूढी अजूनही काही भागांत दिसून येते. मात्र योग्य मार्गदर्शन आणि वेळेवर हस्तक्षेप झाला तर जीव वाचू शकतो, हे सांगलीच्या बेंद्री गावातील एका घटनेने पुन्हा सिद्ध केले आहे. कल्पना राजेश वाघमारे या आदिवासी गरोदर मातेला तीव्र पोटदुखी झाल्यानंतर आशा स्वयंसेविका, १०८ रुग्णवाहिका आणि ग्रामीण रुग्णालय तासगावच्या डॉक्टरांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे प्रसूती यशस्वीरीत्या झाली. माता व बाळ दोघेही सुरक्षित आहेत.

३ सप्टेंबर रोजी सांगलीच्या बेंद्री येथील कल्पना वाघमारे यांना पोटात तीव्र वेदना होऊ लागल्या. घरातील लोकांनी गावातील आशा स्वयंसेविका सौ. विद्या कांबळे यांना तातडीने कॉल केला. विद्याताईंनी लगेच १०८ वर संपर्क साधला. मात्र सुरुवातीला कॉल लागत नव्हता. त्यामुळे प्रा. आ. केंद्र येळावी येथील रुग्णवाहिका बेंद्रीकडे रवाना करण्यात आली. नंतर १०८ कडून कॉल आला आणि तासगावची रुग्णवाहिका पाठवण्यात आली. बेंद्री व तासगावचे अंतर जवळचे असल्याने येळावीची गाडी मागे पाठवण्यात आली.
मात्र गरोदर मातेची झोपडी येरळा नदीच्या काठावर असल्याने रुग्णवाहिका थेट तिथपर्यंत पोहोचू शकली नाही. कच्चा रस्ता, पाऊस यामुळे अडचणी आल्या. शेवटी गरोदर मातेला सुमारे दोन किलोमीटर पायीच घेऊन यावे लागले. वेदना असतानाही ती शेताजवळ बसून गाडीची वाट पाहत होती. अखेर रुग्णवाहिका पोहोचली आणि तिला ग्रामीण रुग्णालय तासगाव येथे दाखल करण्यात आले.

रुग्णालयात डॉक्टर तेजस किल्लेदार, आरोग्य सेविका महानंदा बन्ने आणि डॉक्टर तानाजी पाटील यांनी तातडीने दखल घेतली. गरोदर मातेला कितवा महिना आहे हे तिलाच माहीत नव्हते. सोनोग्राफीसाठी तासगाव मधील काही डॉक्टरांना फोन करण्यात आला. मात्र महिलेचे आधार कार्ड नसल्याने सोनोग्राफी करता आली नाही. अशा परिस्थितीत ग्रामीण रुग्णालयातच प्रसूती करण्याचा निर्णय घेण्यात आला आणि नंतर सांगली सिव्हिल हॉस्पिटलला पाठवण्याचे नियोजन ठेवण्यात आले.
डॉक्टर, नर्सेस आणि आशा यांच्या एकत्रित प्रयत्नांना यश आले. प्रसूती व्यवस्थित झाली. माता आणि बाळ दोघेही सुखरूप आहेत.

ही घटना फक्त एका प्रसूतीची यशोगाथा नाही, तर आदिवासी भागातील आरोग्य जागरूकतेचे महत्त्व अधोरेखित करणारी आहे. घरी प्रसूती झाली असती तर मातेला धोका निर्माण होऊ शकला असता. वेळेवर आशाला कॉल केल्यामुळे आणि आरोग्य यंत्रणेने तातडीने प्रतिसाद दिल्यामुळे दोन जीवांना वाचवता आले. आशा स्वयंसेविका विद्या कांबळे, १०८ यंत्रणा आणि ग्रामीण रुग्णालय तासगावच्या डॉक्टरांचे प्रयत्न कौतुकास्पद ठरले.
