दिली २ लाख २३ हजारांची मदत, विजेचा धक्का लागून झाला होता मागील महिन्यात मृत्यू
संकेत पाटील /तासगाव
लोढे (ता. तासगाव) येथील तरुण शेतकरी आकाराम प्रल्हाद रुपनर यांचा ३ ऑगस्ट रोजी लोढे तलावावर मोटार सुरू करण्यासाठी गेले असता विजेचा धक्का लागून दुर्दैवी मृत्यू झाला. कुटुंबाचा आधार असलेल्या आकाराम यांच्या अकाली निधनाने रुपनर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. या दुःखाच्या प्रसंगी लोढे तलावातील लाभधारक शेतकरी बांधवांनी माणुसकीची जपणूक करत रुपनर कुटुंबीयांना आर्थिक मदतीचा हात दिला.

लोढे तलावावर लोढे, कौलगे, आरवडे आणि डोर्ली येथील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन पाणीवाटप संस्था स्थापन केली आहे. या संस्थेच्या सभासद व लाभधारक शेतकऱ्यांनी एकत्रितपणे निधी गोळा करून २ लाख २३ हजार रुपये जमा केले. ही रक्कम रुपनर कुटुंबीयांच्या हाती सुपूर्द करण्यात आली.
आकाराम रुपनर यांच्या अपघाती निधनाने शेतकरी बांधवांमध्येही हळहळ व्यक्त होत होती. दुःखाच्या प्रसंगी केवळ सांत्वन न करता कुटुंबाला आर्थिक आधार देण्याचा निर्णय घेत शेतकऱ्यांनी सामाजिक बांधिलकी जपली. या मदतीमुळे संकटात सापडलेल्या रुपनर कुटुंबाला काहीसा आधार मिळाला आहे.
यावेळी पाणीवाटप संस्थेचे अध्यक्ष प्रकाश औताडे, उपाध्यक्ष युवराज दादा पाटील, सचिव राम दादा, तसेच चेअरमन आप्पासो पाटील, माजी सरपंच विलास पाटील, युवक राष्ट्रवादी सचिव श्रीनिवास पाटील, दुर्योधन पाटील, लक्ष्मण पाटील, सत्यवान पाटील, बाळासो पाटील यांच्यासह लोढे येथील ग्रामस्थ व तलावातील लाभधारक शेतकरी बांधव उपस्थित होते.
