आमदार रोहित पाटील यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र
संकेत पाटील /तासगाव
तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघातील तासगाव व कवठेमहांकाळ तालुक्यांमध्ये यंदाच्या पावसाळ्यात अपेक्षित व सरासरीच्या तुलनेत अत्यल्प पाऊस झाल्याने गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. पावसाअभावी भूजल पातळी खालावली असून विहिरी, कूपनलिका व अन्य जलस्रोतांची पाणीपातळी कमी झाली आहे. त्यामुळे पिण्याचे पाणी, शेती, पशुधन आणि बागायती पिकांवर परिणाम होण्याची शक्यता आहे.
या पार्श्वभूमीवर मतदारसंघात दुष्काळसदृश परिस्थिती घोषित करून आवश्यक उपाययोजना तातडीने करण्यात याव्यात, अशी मागणी आमदार रोहित आर. आर. पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

17 सप्टेंबर रोजी दिलेल्या पत्रात आमदार पाटील यांनी तासगाव व कवठेमहांकाळ तालुक्यांतील पावसाची स्थिती आणि पाणीटंचाईच्या संभाव्य संकटाकडे शासनाचे लक्ष वेधले आहे.
पावसाअभावी अनेक गावांमध्ये भूजल पातळी खालावत असून उपलब्ध जलस्रोतांवर ताण वाढला आहे. आगामी काळात पाऊस न झाल्यास काही गावांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठ्याची आवश्यकता भासू शकते. पशुधनासाठी पिण्याचे पाणी आणि चाऱ्याची उपलब्धताही अडचणीची ठरण्याची शक्यता आहे.
मतदारसंघातील बागायती क्षेत्रालाही पाणीटंचाईचा फटका बसत असून विहिरी व कूपनलिकांची पाणीपातळी कमी झाल्याने द्राक्ष, ऊस व अन्य पिकांना आवश्यक पाणी देणे शेतकऱ्यांना कठीण होत आहे. खरीप हंगामातील पिकांवरही पावसाअभावी प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता आहे.
पिण्याचे पाणी, पशुधनासाठी पाणी व चारा तसेच शेती व बागायती पिकांच्या संरक्षणासाठी शासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात आणि परिस्थितीची दखल घेऊन आवश्यक निर्णय घ्यावा, अशी मागणी आमदार रोहित पाटील यांनी केली आहे.
