खानापूर–आटपाडी मतदारसंघाचे आमदार सुहास बाबर यांनी गलाई बांधवांच्या प्रलंबित प्रश्नांना विधानसभेत आवाज दिल्यानंतर त्यांच्या पुढाकाराचे कौतुक होत आहे. या पार्श्वभूमीवर All Kerala Gold and Silver Maratha Associationच्या पदाधिकाऱ्यांनी विटा येथे भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले. बैठकीत कारागीरांवरील चौकशी, कायदेशीर संरक्षण आणि मदत यंत्रणा उभारणीसंदर्भात महत्त्वपूर्ण चर्चा पार पडली.
खानापूर आटपाडी मतदारसंघाचे विधानसभा आमदार सुहास बाबर (Suhas Babar ) यांनी गलाई बांधवांच्या समस्या थेट विधानसभेत मांडल्या. आ. सुहास बाबर यांनी गलाई बांधवांसाठी घेतलेल्या या पुढाकाराबाबत ‘ऑल केरला गोल्ड अँड सिल्व्हर मराठा असोसिएशन’च्या ( All Kerala Gold and Silver Association ) पदाधिकाऱ्यांनी आ. सुहास बाबर यांची विटा (Vita) येथे भेट घेऊन अभिनंदन केले. यावेळी त्यांची नॅशनल गोल्ड अँड सिल्व्हर असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांसोबतही चर्चा पार झाली. ‘ऑल केरला गोल्ड अँड सिल्व्हर मराठा असोसिएशन’च्या स्थापनेमागील उद्देश, कार्यपद्धती आणि संघटनेची व्याप्ती याबाबत त्यांना सविस्तर माहिती देण्यात आली.

केंद्र सरकारमार्फत कारागीर बांधवांवर होत असलेल्या वैयक्तिक चौकशीच्या मुद्द्यावर “केवळ आमच्याच समाजाला लक्ष्य का केले जात आहे?” असा सवाल गलाई बांधवांनी उपस्थित केला. या संदर्भात आमदार सुहास बाबर यांना सविस्तर निवेदनही देण्यात आले. नॅशनल गोल्ड असोसिएशनचे वकील व चार्टर्ड अकाउंटंट (CA) सदस्यांकडून कारागीरांना कायदेशीर संरक्षण, मार्गदर्शन आणि आवश्यक ती मदत कशा प्रकारे मिळू शकते यावरही चर्चा झाली. विशेषतः केरळमध्ये एखादा कारागीर अडचणीत आल्यास त्याला तातडीने मदत मिळावी, यासाठी सक्षम यंत्रणा उभारण्याबाबत मागणी करण्यात आली.
नॅशनल गोल्ड कमिटीने या सर्व प्रश्नांची गांभीर्याने दखल घेत लवकरच प्रतिनिधी केरळला भेट देऊन पुढील मार्गदर्शन करण्याचे आश्वासन दिले.
एक मराठी माणूस म्हणून केंद्र शासन दरबारी ठाम पाठिंबा देण्याची आणि भविष्यातील अडचणींमध्ये संघटनेच्या पाठीशी दृढपणे उभे राहण्याची विनंती आमदार सुहास भैया बाबर यांच्याकडे करण्यात आली. ही बैठक केवळ औपचारिक न राहता, ‘ऑल केरला गोल्ड अँड सिल्व्हर मराठा असोसिएशन’ची एकजूट आणि संघटित ताकद प्रशासनापर्यंत प्रभावीपणे पोहोचवणारा महत्त्वपूर्ण उपक्रम ठरला.

यावेळी नॅशनल गोल्ड अँड सिल्व्हर रिफायनर्स अँड ज्वेलर्स असोसिएशन (NGSRJA) चे राष्ट्रीय संयोजक आणि नॅशनल जेम्स अँड ज्वेलरी कौन्सिल ऑफ इंडिया (NGJCI) चे बोर्ड सदस्य श्री. सतीश प्रतापराव साळुंके यांचा विशेष उल्लेख करण्यात आला. ते केंद्र सरकारशी सातत्याने संपर्कात असून देशभरातील लघु व सूक्ष्म रिफायनर्सच्या कल्याणासाठी प्रभावीपणे कार्यरत आहेत. त्यांच्या प्रयत्नांमुळे या क्षेत्रातील कारागीरांना धोरणात्मक सहाय्य व संरक्षण मिळवून देण्यास मोठा हातभार लागला आहे.
