संकेत पाटील/तासगाव
यंदा उन्हाळी पाऊस अत्यंत कमी झाल्याने चिंतेत असलेल्या सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यासाठी रविवारचा दिवस दिलासादायक ठरला. दुपारनंतर वातावरणात अचानक बदल होऊन तालुक्यात सर्वदूर वळीवाच्या जोरदार सरी कोसळल्या.
एप्रिल-मे महिन्यात पावसाने दडी मारल्याने जमीन तापली होती. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी खरीपपूर्व मशागतीची कामे, नांगरणी आणि कुळवणी लांबणीवर टाकली होती. मात्र, रविवारी दुपारी 3 नंतर सुरू झालेला पाऊस सुमारे दोन ते अडीच तास सलग बरसला. या जोरदार सरींमुळे शेतशिवारात पाणी साचले असून, जमीन ओलीचिंब झाली आहे.
पाऊस नसल्याने शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लागला होता. पण या पावसाने आता शेतकरी सुखावला आहे. उद्यापासून पेरणीपूर्व मशागतीलाही आता वेग येईल.
दरम्यान, या पावसामुळे गेल्या काही दिवसांपासून वाढलेल्या उष्णतेच्या पाऱ्यालाही ब्रेक लागला आहे. कमाल तापमानात 4 ते 5 अंश सेल्सिअसने घट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या तासगावकरांना मोठा दिलासा मिळाला असून, रविवारचा दिवस खऱ्या अर्थाने तासगावकरांसाठी 'रेनी डे' ठरला.
