शेतकऱ्यांना पाण्याचा थेंब मिळेना नेत्यांची मात्र सोशल मीडियावर फोटोबाजी । संजय पाटील आक्रमक ।


तासगाव तालुक्यातील ताकारी Takari irregation scheme आणि टेंभू उपसा सिंचन (Tembhu irregation scheme) योजनेच्या लाभक्षेत्रातील गावांमध्ये सध्या भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. मार्च महिना संपत आला तरी प्रशासनाकडून उन्हाळी आवर्तन अद्याप सुरू करण्यात आलेले नाही. या दिरंगाईमुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली असून, या प्रश्नी प्रशासनाला जाब विचारण्यासाठी माजी खासदार संजयकाका पाटील (sanjaykaka patil) यांच्या नेतृत्वाखाली तासगाव येथील जलसंपदा विभागाच्या उपविभागीय कार्यालयावर लाभधारक शेतकऱ्यांसह ‘ठिय्या आंदोलन’ करण्यात आले.


प्रसारमाध्यमांशी बोलताना संजयकाका पाटील पुढे म्हणाले की, आम्ही सत्तेत आणि पदावर असताना सर्व विभागांशी योग्य समन्वय राखून वेळेत पाणी आणण्याचे काम चोखपणे बजावत होतो. मात्र, सध्या लोकप्रतिनिधींना शेतकऱ्यांच्या प्रश्नांपेक्षा श्रेयवादात अधिक रस असल्याचे दिसत आहे. विद्यमान आमदार कोणाचाही वाईटपणा घ्यायला तयार नाहीत त्यामुळे शेजारच्या मतदारसंघांमध्ये दोन-दोन वेळा पाणी फिरून आले, तरीही तासगाव तालुक्यावरच अन्याय का होत आहे? याचे उत्तर लोकप्रतिनिधींनी दिले पाहिजे. जमिनीवर प्रत्यक्ष परिस्थिती अत्यंत भीषण असताना, केवळ फेसबुक आणि व्हाट्सअपवर पाण्याचे फोटो टाकून जनतेची दिशाभूल करण्याचे काम थांबवले पाहिजे. या श्रेयवादाच्या लढाईत सामान्य शेतकऱ्याचे आणि त्याच्या फळबागांचे अतोनात नुकसान होत आहे.


द्राक्षबागांच्या छाटण्या आणि उसाच्या शेतीला पाण्याची नितांत गरज असतानाच पाणीटंचाईने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. जलसंपदा विभागाच्या नियमानुसार 5 मार्च रोजी उन्हाळी आवर्तन सुरू होणे अपेक्षित होते, परंतु मार्च अखेर उजाडली तरी योजना बंदच आहेत. प्रशासनावरील पकड ढिली झाल्यामुळेच ३० मार्च उजाडला तरी पाण्याचा पत्ता नाही, असेही पाटील यांनी नमूद केले.
या आंदोलनाद्वारे कार्यकारी अभियंता (ताकारी व टेंभू विभाग) यांना निवेदन देण्यात आले असून, ताकारीच्या मुख्य कालव्यातून येरळा नदीत तातडीने पाणी सोडण्याची मागणी करण्यात आली आहे. जर तातडीने पाणी सोडण्याचे नियोजन झाले नाही, तर जनतेचा संयम सुटेल आणि होणाऱ्या परिणामांना सर्वस्वी प्रशासन व लोकप्रतिनिधी जबाबदार राहतील, असा इशाराही यावेळी देण्यात आला. या आंदोलनामुळे तासगाव तालुक्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, आगामी काळात हा संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

काय म्हणाले संजय पाटील ?

शेतकरी पाण्यासाठी हवालदिल झाला असताना, विद्यमान लोकप्रतिनिधी मात्र केवळ सोशल मीडियावर पाण्याचे पोकळ दावे करण्यात व्यस्त आहेत. शेजारच्या मतदारसंघांत दोनवेळा पाणी गेले, मग तासगावच्याच वाट्याला अन्याय का? नुसत्या फेसबुक-व्हॉट्सअ‍ॅपवरच्या फोटोंनी शेतकऱ्यांची तहान भागणार नाही, आम्हाला तातडीने प्रत्यक्षात पाणी हवे आहे.जर तातडीने पाणी सोडण्याचे नियोजन झाले नाही, तर जनतेचा संयम सुटेल आणि होणाऱ्या परिणामांना सर्वस्वी प्रशासन व लोकप्रतिनिधी जबाबदार राहतील,
संजयकाका पाटील (माजी खासदार)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *